Weather News : पुन्हा अवकाळी पावसाचं संकट! `या` भागांत यलो अलर्ट; तर इथे गारपीटीची शक्यता
Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात परत बदल दिसून येत आहे. अचानक हुडहुडी जाणवायला लागली असून काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Maharashtra Weather News : देशातील वातावरणात पुन्हा बदल होत असून मराहाष्ट्रासह अनेक राज्यात थंडीची हुडहुडी भरली आहे. काही ठिकाणी बर्फाची चादर पसरली आहे. तर काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. (maharashtra weather Unseasonal rain crisis again Yellow alert in these areas marathwada Vidarbha thunderstorm and cold wave in india Weather latest update)
राज्यातील वातावरण कसं असेल?
पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड आणि लातूर या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर जालना, हिंगोली आणि परभणी वादळी वाऱ्यांसह हलका आणि मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविण्यात आला आहे. त्यासोबत जळगाव, पुणे, सांगली आणि सोलापुरातही पावसाच्या सरीचा अंदाज आहे. त्यामुळे बळीराजा चिंत असून हातातोंडाशी आलेल्या पिकाकडे तो डोळे लावून बसला आहे.
हवामान विभागाकडून प्रसिद्ध झालेल्या नागपूर रडार प्रतिमानुसार पुढील 2 तासांत विदर्भात मध्यम ते तीव्र गडगडाटी वादळासह विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तर काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. वर्ध्या जिल्ह्यातील देवळीमध्ये शनिवारी गारपीट झाली.