Maharashtra Weather: राज्याच्या `या` भागात Orange Alert; देशात कसं असेल हवामान?
Weather Update : राज्यात सुरु असणारं अवकाळीचं सत्र सध्या आणखी लांबल्याचं लक्षात येत आहे. एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडाही राज्यात गारपीटीची शक्यता असून, पाहा कोणत्या भागावर याचे जास्त परिणाम दिसून येतील...
Weather Update : एप्रिल महिना संपून आता मे महिना सुरु होण्याची चाहूल लागली असली तरीही राज्यातून अवकाळी मात्र काढता पाय घेण्याचं नाव घेत नाहीये. काही दिवसांपूर्वीच हवामान विभागानं 24 ते 28 एप्रिलदरम्यान राज्यात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर, भर उन्हाळ्याच्या दिवसांमध्येसुद्धा राज्यातून अवकाळी आणि गारपीट काढता पाय घेताना दिसत नाहीये. हवामान विभागानं वर्तवलेल्या नव्या अंदाजानुसार विदर्भात पुन्हा ऑरेंज जारी करण्यात आला आहे. सोबतच राज्याच्या या भागात दोन दिवस गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (maharashtra weather Unseasonal Rain hailstorm predictions orange alert latest update)
25 आणि 26 एप्रिल रोजी विदर्भातील भंडारा चंद्रपूर, गडचिरोली यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांमध्ये दुपार नंतर गारपिटी होण्याची अधिक शक्यता व्यक्त केली आहे. तर या शेवटच्या आठवड्यात इतर दिवशी यलो अलर्टसह विजांचा कडकडाट, हलका मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला.
तूर्तास उष्णतेची लाट नाही
आयएमडीच्या माहितीनुसार तूर्तास देशात उष्णतेची लाट येणार नसून तापमानात दोन ते तीन अंशांची घट नोंदवली जाऊ शकते. काही राज्यांमध्ये असणाऱ्या पावसाच्या हजेरीमुळं एकंदरच तापमानाचा आकडा कमी असेल.
हेसुद्धा वाचा : Chardham Yatra 2023 : केदारनाथ धामची कवाडं भाविकांसाठी खुली; मंत्रमुग्ध करणारा त्या क्षणांचा Video पाहाच
एप्रिलच्या आठवड्याअखेर तुम्ही पर्यटनासाठी एखाद्या ठिकाणी जाऊ इच्छिता, तर त्यासाठी हवामान तुमच्या वाटेत अडथळे निर्माण करणार नाही. कारण तापमानातील घट उन्हाच्या झळांपासून तुम्हाला दूर ठेवणार आहे. देशातील अनेक भागांमध्ये 25 ते 28 एप्रिलदरम्यान तुफान पाऊस कोसळणार असल्यामुळं या बाबतीत मात्र सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
कोणत्या राज्यांमध्ये कोसळधार?
स्कायमेटच्या अंदाजानुसार बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, तामिळनाडू आणि केरळमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल. तर, दक्षिण छत्तीसगढ, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग आणि पश्चिम बंगालच्या काही भागातली पाऊस हजेरी लावणार आहे. सिक्कीम, ओडिशालाही दरम्यानच्या काळात पावसाचा तडाखा बसणार आहे.
तिथे देशाच्या अती उत्तरेकडे असणाऱ्या हिमाचल प्रदेश, स्पितीचं खोरं, लडाख, काश्मीरचं खोरं, उत्तराखंडमधील केदारनाथ, गंगोत्री आणि इतर काही भागांमध्ये मात्र बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. किंबहुना बर्फवृष्टीमुळं चारधाम यात्राही प्रभावित झाली असून, प्राथमिक स्तरावर प्रशासनानं 30 एप्रिलपर्यंत भाविकांची नोंदणीही बंद
ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय हवामानाचा अंदाज घेऊनच नागरिकांनी चारधाम यात्रेची आखणी करावी असं आवाहन खुद्द उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केलं आहे.