Maharashtra Weather : अवकाळी रिटर्न्स! हवामान विभागाकडून या आठवड्यासाठी मिळाला महत्त्वाचा इशारा
Maharashtra Weather : सातत्यानं बदलणाऱ्या हवामानाचे हे तालरंग नव्या आठवड्यातही पाहता येणार आहेत. एकिकडे उन्हाच्या झळा सोसत नसल्यामुळं नागरिकांचे हाल होत असतानाच आता पुन्हा एकदा अवकाळी राज्यातील काही भागाला झोडपणार आहे.
Maharashtra Weather : एप्रिल महिना संपण्याच्या मार्गावर असून आता मे महिना आणि त्याच्या अखेरीस सुरु होणाऱ्या मान्सूनच्या वाटलाचीकडे अनेकांच्याच नजरा लागल्या आहेत. त्यातच राज्यात उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊ लागल्यामुळं तापमानात घट कधी होणार? हाच प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे. तूर्तास तापमानात अंशत: घट होणार असली तरीही ती समाधानकारक नसेल. कारण, राज्यात अवकाळी परतला आहे.
मेघगर्जना आणि अवकाळीचा तडाखा...
राज्यातील काही भागांमधून अवकाळीनं काढता पाय घेतलेला असतानाच आता पुन्हा एकदा हे संकट परतताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यावर पुढील किमान 5 दिवस अवकाळीचे ढग कायम राहणार आहेत. याचा फटका विदर्भाला मोठ्या प्रमाणात बसेल. तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातही ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी पाहायला मिळेल.
विदर्भासह आणखी कुठे बरसणार अवकाळी?
या नव्या आठवड्यामध्ये विदर्भात नागपूरसह बऱ्याच राज्यांमध्ये वातावरणाची स्थिती कायम राहणार असून, आता इतक्यात तरी अवकाळी काढता पाय घेत नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेसुद्धा वाचा : MPSC परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल प्रकरणात मोठी अपडेट; एकाला अटक
विजर्भाव्यतिरिक्त सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि पुण्यातील काही जिल्ह्यांना अवकाळीचा तडाखा बसू शकतो. 24 ते 26 एप्रिलदरम्यान पावसाचं प्रमाण अधिक असेल, तर आठवड्याच्या मध्यापासून ते कमी होण्यास सुरुवात होईल. काही भागांमध्येम मात्र सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस अवकाळी अडचणी निर्माण करताना दिसणार आहे.
गारपीटीमुळं पुन्हा शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार...
मराठवाड्यात अवकाळीसोबतच 26- 27 एप्रिलदरम्यान जोरदार स्वरुपातील पाऊस होणार असून, सोबतच गारपीटीचा तडाखाही बसणार आहे. ज्यामुळं पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडताना दिसत आहे. तुलनेनं मुंबई, कोकणात मात्र उष्णतेचा दाह आणखी वाढल्याचं जाणवणार आहे. ज्यामुळं नागरिकांनी आरोग्य जपावं असं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
देशातील हवामानाचा आढावा
इथं राज्यातील हवामानात बदल होत असतानाच देशातही अशीच काहीशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला चंदीगढच्या तीन जिल्ह्यांमध्ये वादळाचा इशारा देण्यात आला आहे, तर उत्तराखंडमध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागालाही सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. केदारनाथ आणि नजीकच्या परिसरात पुढील काही दिवस बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या सुरु असणारी चारधाम यात्रा आणि उत्तराखंडमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या पाहता यंत्रणा हवामान बदलांना अनुसरून सध्या सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.