MPSC Exam : MPSC हॉलतिकीटप्रकरणी डेटा लिकप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी नवी मुंबईतून एकाला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. बेकायदारित्या माहिती प्रसारित केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला व्यक्ती हा MPSC 2023 A टेलिग्राम चॅनलचा तो ऍडिमन आहे.
MPSCचे 1 लाखाहून अधिक हॉलतिकीट टेलिग्रामवर व्हायरल झाल्यानं विद्यार्थ्यांमध्ये खळबळ माजली आहे. त्यानंतर सीबीडी बेलापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. हॉलतिकीट व्हायरल झालं तरी 30 तारखेलाच पेपर होणार असल्याचं स्पष्टीकरण एमपीएससीने दिले आहे. मात्र तारीख न बदलल्याने विद्यार्थी संतापले आहेत (MPSC Exam ).
एमपीएससी अभ्यासक्रमावरुन काहीच महिन्यांपूर्वी विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यात आत 30 एप्रिलला होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षेचं हॉल तिकीट आयोगानं विद्यार्थ्यांना देण्याआधीच टेलिग्रामवर व्हायरल झाले. संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, आणि क च्या परीक्षेचे हॉल तिकीट व्हायरल झाल्याने एमपीएससीची वेबसाईट हॅक झाल्याचा आरोप करण्यात आला. टेलिग्रामवर तब्बल एका लाखापेक्षा जास्त हॉल तिकिट अपलोड करण्यात आल्याने लाखो विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एमपीएससीचा पेपर सुद्धा हॅकरकडे असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.
राज्य सेवा परीक्षांसाठी स्वतंत्र आयोग असताना इतका घोळ का होतोय?
गेल्या काही वर्षात एमपीएससी आणि वाद हे एक समीकरण बनलंय. काही महिन्यांपूर्वी एमपीएससी अभ्यासक्रमावरुन हजारो विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता तर चक्क एमपीएससी परीक्षेची हॉलतिकिटं टेलिग्रामवर व्हायरल झालीयेत. परीक्षेचा पेपर व्हायरल तर झाला नाही ना याची भिती विद्यार्थ्यांना आहे. राज्य सेवा परीक्षांसाठी स्वतंत्र आयोग असताना इतका घोळ का होतो असा संतप्त सवाल विचारला जात आहे.