Maharashtra Weather : महाराष्ट्रात सुरु असणारं अवकाळीचं (Unseasonal Rain) सत्र काही अंशी शमलं. उन्हाळ्याच्या दिवसांत पावसाळा सुरु झाला का, असं वाटत असतानाच राज्यात पुन्हा एकदा विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान वाढीची नोंद करण्यात आली. इथे शनिवार आणि रविवारी मुंबईसह (Mumbai Rain) कोकणात पावसानं हजेरी लावलेली असतानाच चंद्रपुरात मात्र तापमानानं 43 अंश सेल्शिअस इतका आकडा गाठला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिकमध्येही (Nashik) अवकाळीचे ढग आता सरले असून, तापमान 39 अंशांवर पोहोचल्याची नोंद करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातही सूर्यनारायणाचा प्रकोप आता जाणवू लागला आहे. पण, राज्याचा काही भाग मात्र याला अपवाद ठरत आहे. कारण, उन्हाचा दाह एकिकडे वाढत असला तरीही दुसरीकडे अवकाळीनं मात्र अद्यापही हार मानली नसल्याचं स्पष्ट होत आहे. 


हवामान तज्ज्ञांच्या मते, रविवार 23 एप्रिलपर्यंत राज्यात ढगाळ वातावरण कायम राहील. ज्यामुळं (Konkan Rain Predictions) कोकण पट्टा सर्वाधिक प्रभावित होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस ढगाळ वातावरणासह पावसाच्याही सरी बरसणार आहेत. शिवाय नाशिक, धुळे, नंदुरबारमध्येही पावसाच्या तुरळक सरी बरसतील असा अंदाज आहे. 


पुढील दोन दिवस भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये उष्णतेची लाट 


भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार देशाच्या पूर्वेकडील भागात पुढील 4 दिवस तर, उत्तर पश्चिम क्षेत्रात पुढील दोन दिवस उष्णतेची लाट येऊ शकते. देशाच्या उत्तर पश्चिम भागाविषयी सांगावं तर, यामध्ये जम्मू काश्मीर, लडाख, बालटिस्तान, उत्तर प्रदेश, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडचा समावेश होतो. तर, पूर्व भारतामध्ये पश्चिम बंगाल, सिक्किम, ओडिशा, झारखंड, उप हिमालय क्षेत्रांचा समावेश होतो. या भागांमध्ये तापमान सामान्यहून अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, पश्चिम हिमालय क्षेत्रामध्ये पश्चिमी झंझावात सक्रिय झाला आहे. 


हेसुद्धा वाचा : गौतमी पाटील म्हणते 'पाटलाचा बैलगाडा' तरुणाईचा पुन्हा राडा... पुण्यात पोलिसांचा लाठीचार्ज


 


लडाख, जम्मू काश्मीरमध्ये होणारी तापमानवाढ इतर भागांपेक्षा तुलनेनं कमी असली तरीही इथं काही भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते. पुढच्या दोन दिवसांत हिमाचलच्या काही भागांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं पर्यटनाच्या हेतूनं  या भागांना भेट देण्यासाठी येणाऱ्यांनी हवामानाचा अंदाज विचारात घ्यावा ही महत्त्वाची बाब.