मुंबईत दिवाळी पहाटेची सुरुवात 26 अंशांच्या तापमानात; तर महाराष्ट्रासाठी पुढचे 48 तास महत्त्वाचे
महाराष्ट्रात कुठे मुसळधार पाऊस तर कुठे ऑक्टोबर हिट, कसा असेल दिवाळीचा पहिला दिवस?
मुंबईत दिवाळीची सुरुवातच यंदा ऑक्टोबर हिटपासून होताना दिसत आहे. अद्याप मुंबईत थंडी दाखल झालेली नाही. मुंबईतील पहाटेचे तापमान 26 अंशांच्या पुढेच राहणार आहे. त्यामुळे दिवाळीत थंडीऐवजी मुंबईकरांची गरमी सहन करावी लागत आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
चार दिवसांपूर्वी मुंबईचे किमान तापमान 21 अंशांपर्यंत खाली आले होते. त्यावेळी हवेत गारवा निर्माण झाल्यानंतर थंडीची चाहूल लागली होती, पण तो गारवा दोन दिवसांतच गायब झाला. दिवाळी सुरू होऊनही थंडीचा पत्ता नसल्याने मुंबईकर हिरमुसले आहेत.
बुधवारी सांताक्रुझमध्ये किमान तापमानात तीन अंशांची मोठी वाढ झाली आणि पारा 24.5 अंशांवर झेपावला. तसेच कमाल तापमान 35 अंशांच्या पातळीवर गेले होते. कुलाब्यातील किमान तापमान 27 अंशांवर पोहोचले होते. त्यामुळे पहाटेपासून संपूर्ण दिवसभर मुंबईकर उकाड्याने त्रस्त झाले. ही स्थिती पुढील आठवडाभर कायम राहील. किमान तापमान 25 ते 26 अंशांवर जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दिवाळीवर पावसाचं संकट कायम राहणार आहे. आज आणि उद्या म्हणजे पुढचे 48 तास महाराष्ट्रातील काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील नांदेड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. महाराष्ट्रातील इतर भागात ढगाळ हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
ऑक्टोबर हिट
ऑक्टोबर हिटचा चटका राज्याच्या अनेक भागात जाणवत आहे. सोलापूरात बुधवारी सकाळपर्यंत सर्वाधिक 35.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, अकोला आणि वर्धा येथील तापमान 35 अंश सेल्सिअसवर होते. तसेच अमरावती, डहाणू, नागपूर, परभणी, वाशीम, यवतमाळ येथे 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यातील सर्वात थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर येथे सर्वात कमी 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.