काळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, `या` 17 जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट
Maharashtra Weather Update: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर कमी होणार आहे.
Maharashtra Weather Update: मुंबईसह महाराष्ट्राला गेल्या काहि दिवसांपासून पावसाने झोडपले होते. अजूनही राज्यातील काही भागांत मुसळधार पाऊस बरसत आहे. मुसळधार पावसामुळं राज्यातील तलावांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये पाणी पातळीत वाढ झाली आहे. दोन दिवसांनी पावसाचा जोर ओसरणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला होता. पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवरील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असून, त्याचे वाऱ्याच्या चक्रीय स्थितीत रुपांतर झाले आहे. त्यामुळे विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. राज्याच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर कायम आहे. मात्र, शुक्रवार 26 जुलै पासून पावसाचा जोर ओसरणार असल्याचा अंदाज आहे. किनारपट्टीवरील पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, घाटमाथ्यावर आणखी दोन दिवस पावसाचा जोर राहणार आहे.
घाट परिसर वगळता मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर शुक्रवारपासून कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, आज बुधवारसाठी हवामान विभागाने रायगड, साताऱ्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. तर, नाशिक, पुण्यासह काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर, नागपूर, अमरावतीला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना आज अलर्ट
रेड अलर्ट – रायगड, सातारा
ऑरेंज अलर्ट – सिंधुदर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक.
यलो अलर्ट – नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती.
चंद्रपुरात हाहाकार
शहर जिल्ह्यात गेले 3 तासापासून पावसाची संततधार सुरू असून इरई धरणाची सर्व 7 दारे 1 मीटरने उघडली गेली आहेत. इरई नदीत सध्या 462 क्युमेंक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळं नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस
पुण्यातील घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झालाय. भोर वेल्हा मुळशी भागात 200 मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे. मुळशी धावडी भागात 229 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.