पुढील 2-3 दिवस काळजीचे! विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा पावसाचे धुमशान; या जिल्ह्यांसाठी अलर्ट
Maharashtra Weather Update: राज्यात गुरुवारपासून पुन्हा एकदा पाऊस धुमाकुळ घालणार आहे. कसं असेल राज्यातील हवामान जाणून घ्या
Maharashtra Weather Update: मुंबईसह महाराष्ट्रात पावसाने धुमाकुळ घातल्याने आज जुलैअखेर पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. मात्र, 1 ऑगस्टपासून पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
जूनमध्ये पावसाने दडी मारली होती. मात्र, जुलै महिन्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. जुलै महिन्यात पावसाने जूनची तुट भरुन काढली आहे. जून-जुलै महिन्यात एकूण पावसापेक्षा अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. मराठवाडा वगळता संपूर्ण राज्यात या महिन्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. राज्यातील धरणांतही समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे.
जुलै अखेर काही दिवस पावसाने विश्रांती घेतली आहे. तर, गुरुवारपासून पुन्हा एकदा पाऊस जोर धरणार आहे. गेल्या आठवड्यात किनारपट्टीला समांतर कमीदाबाचा पट्टा सक्रीय झाला होता. त्यामुळं मुंबईसह राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस बरसला होता. मात्र, आता हा पट्टा विरल्याने पावसाचा जोर ओसरला आहे. सध्या अरबी समुद्र आणि सौराष्ट्रच्या भागात चक्रकार वाऱ्याप्रमाणे स्थिती आहे. त्यामुळं पुढील तीन ते चार दिवसांत मुंबईसह राज्यातील इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रुवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 31 जुलैसाठी हवामान विभागाने कोणताही अलर्ट दिलेला नाहीये. मुंबई, रत्नागिरी, पुणे, सातारा, रायगड, ठाणे या जिल्ह्यांत यलो अलर्ट दिला आहे.
विदर्भात यलो अलर्ट
विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम,यवतमाळ, अमरावती, वर्धा,नागपूर,गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.