Maharashtra Weather Update : सहसा बर्फाची चादर, पांढराशुभ्र बर्फ असं काहीतरी म्हटलं की तुमच्याआमच्या डोळ्यांसमोर काश्मीर किंवा हिमाचल प्रदेशातील काही भाग येतो. पण, सध्या वातावरणात होणारे सर्व बदल पाहात हे दृश्य महाराष्ट्रातील नागपुरात पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं होणारे बदल आणि एकंदर वातावरण पाहता नागपुरातील चित्र पूर्णपणे पालटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिजीओमध्ये सर्वत्र गारांचा खच पाहायला मिळत आहे. ही दृश्य पाहून तुम्हालाही हा परिसर काश्मीर वा हिमालया पट्ट्यातील असेल असं वाटलं असावं. पण, हे दृश्य आहे नागपूर जिल्ह्यातल्या पेंचच्या परिसरातील. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather : गारपीट, अवकाळीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नांवर पाणी; संकटांचे ढग दूर जाईना 



रविवारी पेंच जंगल आणि आजूबाजूच्या परिसरातही तुफान गारपीट झाली. त्यानंतर जंगल आणि आजूबाजूच्या परिसरात अक्षरशः गारांचा खच पडला होता. ज्यामुळं जणू इथं बर्फवृष्टीच झाली असं प्रथमदर्शनी जाणवत होतं.  रविवारी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अवकाळी तडाखा बसला. नागपूर शहरासह काटोल, कळमेश्वर, रामटेक, मौदा या ठिकाणी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केलं. बीज अभयारण्याच्या सिल्लारी तसेच खुरसापार परिसरातही गारपीट झाली. त्यानंतर तिथे गारांचा हा खच दिसून होत होता. 


शेतीचं नुकसान 


दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील रविवारी दुपारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. काढणीला आलेला गहू, हरभरा जमिनीवर झोपला तेच संत्र्याचा झाडावर आलेला आंबिया बहारलाही जोरदार फटका बसला आहे. शेतकऱ्यांना घरात येणारा गहू ऐनवेळी आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तोंडचा घास हिरावल्या गेल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. 


मुंबईसह राज्यात इतर भागांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरुच 


राज्यातील कोकण किनारपट्टी, मुंबई आणि इतरही बऱ्याच भागांमध्ये ऊन, पावसाचा खेळ पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसाचे थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसून येऊ लागले आहेत. ज्यामुळं आरोग्य यंत्रणांकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.