Weather Update : राज्यात थंडीची चाहूल लागलेली असतानाच पुन्हा एकदा हवामानाची स्थिती बदलून वातावरणामध्ये बरीच उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं उत्तर महाराष्ट्रात पहाटेच्या आणि रात्रीच्या वेळचं तापमान बऱ्याच अंशी खाली जात असताना इथं दक्षिण महाराष्ट्रात मात्र पावसाची चिन्हं दिसत आहेत. हवामान विभागानंही तशी शक्यता वर्तवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबी समुद्रामध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्यामुळे मुंबई, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुढील काही दिवसांसाठी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. ज्यामुळं 23 नोव्हेंबरपासून पुढील काही दिवस मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 23 ते 26 नोव्हेंबरदरम्यान रायगड, मुंबई, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक इतकंच नव्हे तर, सोलापूर, धाराशिव, लातूर, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची चिन्हं असतील अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. 


दरम्यान, या वातावरणामुळं रब्बीच्या पिकांना मात्र थेट स्वरुपात फायदा मिळताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार किमान तापमानात पुढील काही दिवसांमध्ये समाधानकारक घट नसेल, त्यामुळं थंडीचा प्रभाव काहीसा कमी होताना दिसणार आहे. राज्यातील काही भाग मात्र इथं अपवाद ठरणार आहे, कारण त्या भागांमध्ये थंडीचा कडाका वाढतानाच दिसणार आहे. 


देशातील हवमानातही बदल 


देशातील बहुतांश राज्यांमध्ये तापमानात घट नोंदवली जात आहे. आयएमडीच्या माहितीनुसार सध्या पाकिस्तानात सक्रिय असणारा एक पश्चिमी झंझावात पूर्वेच्या दिशेनं पुढे येत आहे. त्यामुळं उत्तर पश्चिमी भारतामध्ये सोसाट्याचे वारे वाहू शकतात. इतकंच नव्हे, तर या भागांमध्ये तापमानात तीन अंशांची किमान घटही नोंदवली जाऊ शकते असा अंदाज आहे. 


हेसुद्धा वाचा : राष्ट्रवादीच्या गाण्यावर गौतमी नाचली; राजकारणात वादाची ठिणगी पेटली


 


Skymet च्या माहितीनुसार दिल्लीपासून काश्मीरपर्यंत आज शीतलहरी वाहण्याचा अंदाज आहे. तिथं उत्तरेकडील राज्यांमध्ये पर्वतीय क्षेत्रांमध्येही पश्चिमी झंझावाताचे परिणाम दिसून येई शकतात. ज्यामुळं मैदानी क्षेत्रांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसतील. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, काश्मीरचं खोरं आणि लडाखचा बहुतांश भाग थंडाच्या लाटेला सामोरा जाताना दिसेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 26 नोव्हेंबरपर्यंत ढगांची ये-जा सुरु राहणार असल्यामुळं तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाची शक्यता असेल. पूर्वोत्तर भारतासह अंदमान आणि निकोबार बेट समुहांमध्येही पावसाची हजेरी असू शकते.