काळजी घ्या! 5 ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra weather Update: राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पाहा आज हवामान विभागाने काय अलर्ट दिला आहे.
Maharashtra weather Update: राज्यात ऑगस्ट महिन्यापासून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता 1 ऑगस्ट ते 4 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
जुलै महिन्यात पावसाने कहर केला होता. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस बरसला होता. तर, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात मात्र अद्याप हवा तसा पाऊस झाला नाहीयेच त्यामुळं मराठवाड्यात थोडं चिंतेचं वातावरण आहे. कोकणासह विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसला आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातदेखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम बंगाल व लगतच्या दक्षिण बांगला देशवरच्या CYCIR च्या प्रभावाखाली पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता.पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळं येत्या 5 दिवसांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भासह कोकण, मध्य महाराष्ट्र या भागांत तुरळक ठिकाणी अतितीव्र हवामान असणार आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार अद्यापही सुरूच आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत एक इंचाने वाढ झाली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणक्षेत्रात अजूनही पाऊस सुरूच आहे. आज 2 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी मुसळधार पाऊस बरसू शकतो.
राज्यात या जिल्ह्यांना अलर्ट
ऑरेंज अलर्टः पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे
यलो अलर्टः मुंबई, पालघर, नाशिक, ठाणे, जालना, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर व विदर्भाताली काही जिल्हे
रेड अलर्टः कोल्हापूर
पुण्यातील पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस
पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात ९० टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. पानशेत, वरसगाव, टेमघर या तिन्ही धरणात सध्या पाणीसाठा ९० टक्के पेक्षा जास्त पाणीसाठा आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने त्यात ७५ टक्के पाणीसाठा आहे. मागच्या वर्षी याच काळात चार ही धरणात 79.66 टक्के इतका पाणीसाठा होता. यावर्षी याच काळात चार ही धरणं मिळून 89.87 टक्के इतका पाणीसाठा आहे.
धरणातील पाणीसाठा खालीलप्रमाणे
खडकवासला: 75.60 टक्के
पानशेत: 91.01 टक्के
वरसगाव: 90.36 टक्के