Maharashtra Weather Update: जुलैच्या शेवटच्या आठवड्यात उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. १ ऑगस्टपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 1 ते 4 ऑगस्टपर्यंत संपूर्ण राज्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. शनिवार-रविवारी पावसाचा जोर अधिक असू शकतो, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जुलैमध्ये राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. अनेक ठिकाणी तर पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यातील सर्वच धरणांमध्ये 90 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळं दिलासा मिळाला आहे. तर, पावसाने जुलैअखेर काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र, आता एक ऑगस्टपासून पाऊस पुन्हा सक्रीय होणार आहे. 


1 ऑगस्टपासून रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर ठाणे जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आत्तापर्यंत ओढ दिलेल्या भागातही समाधानकारक पावसाची शक्यता आहे. तर, 5 ऑगस्टपासून कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होऊ शकतो. किनारपट्टीवरील हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातून वेगाने बाष्पयुक्त वारे किनारपट्टीवर येत आहे. वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे किनारपट्टीसह पश्चिम घाटमाथ्यावर पुढील तीन दिवस पावसाचा जोर राहणार आहे.


पश्चिम बंगालमधील वाऱ्याच्या चक्रीय स्थितीचा परिणाम म्हणून उत्तर विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. 


गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट


बंगालच्या उपसागरात उत्तरेला सायकलोनिक सर्क्युलेशनमुळे पूर्व विदर्भात पुढील दोन दिवस पावसाचा जोर वाढणार. गडचिरोली जिल्ह्यात  1 ते 31 जुलै पर्यंत दरम्यान 880 MM पाऊस झाला आहे. (सरासरी -435पाऊस अपेक्षित होता )


आज कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट


ऑरेंज इशारा – कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सातारा, पुणे, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया.


यलो इशारा – सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा.