Maharashtra weather : पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यंदा सरासरीहून कमी पर्जन्यमान झालं आणि त्यानंतर आता हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पाऊस न बोलवलेल्या पाहुण्यासारखा आला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्येसुद्धा हा पाऊस काही माघार घेताना दिसला नाही. थोडक्यात वर्षाच्या बाराही महिने देशाच्या विविध भागांमध्ये कमीजास्त प्रमाणात पावसाची हजेरी पाहायला मिळाली आणि हे चित्र पुढच्या काही दिवसांसाठी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्याच्या कोकण आणि मध्य महाराष्ट्र भागामध्ये सध्या थंडीचं प्रमाण कमी झालं असून, इथं पावसाचे ढग घोंगावताना दिसत आहेत. या भागातील जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट झाल्यामुळं थंडीही तुलनेनं कमीच झाली आहे. त्यामुळं सकाच्या वेळी आता उकाडा जाणवू लागला आहे. जिथं काही दिवसांपूर्वी धुळ्याचं तापमान 9 अंशांवर पोहोचलं होतं तिथंच ते आता 12 अंशांवर पोहोचलं आहे. 


राज्याच्या उर्वरित जिल्ह्यांमध्येही किमान तापमानाचा आकडा 14 अंशांहून जास्त असणार आहे, ज्यामुळं ही थंडी आता दडी मारताना दिसतेय असं म्हणणं गैर ठरणार नाही. अरबी समुद्राच्या दक्षिणेकडे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं आता पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून, त्यामुळं मराठवाडा, मध्य महाराष्ट्रापासून विदर्भातील काही भाग आणि थेट गोव्याच्या सीमेलगतच्या काही भागांमध्येही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. 6 जानेवारीनंतर हा पाऊस आणखी जोर धरताना दिसेल असाही इशारा देण्यात आल्यामुळं आता अनेकांच्या चिंतेत भर पडली आहे. 


हेसुद्धा वाचा : मोठी बातमी; मनोज जरांगे यांच्या कुटुंबातच एकही कुणबी नोंद आढळली नाही


 


पुणे वेधशाळेच्या माहितीनुसार अरबी समुद्राच्या दक्षिण पूर्वेकडे निर्माण झालेला विरळ स्वरुपातील कमी दाबाचा पट्टा येत्या काळात तीव्र होणार असून, साऊथ साऊथ ईस्टर्ली वाऱ्यांची तीव्रतासुद्धा वाढेल. मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि पश्चिम उपनगराला मात्र असा कोणताही इशारा नाही.  


देशाच्या उत्तरेकडे वाढतेय थंडी, काश्मीरमधील दल लेकही गोठलं 


इथं महाराष्ट्रातील तापमानात चढ- उतार सुरुच असला तरीही उत्तर भारतात मात्र ही थंडी मोठ्या मुक्कामालाच आल्याचं पाहायला मिळत आहे. राजस्थानपासून पंजाब, उत्तर प्रदेशातही तापमान 6 अंशांवर पोहोचलं आहे. तर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. तिथं काश्मीरच्या खोऱ्यात दर दिवशी थंडी एक नवा विक्रम गाठताना दिसत आहे. 


दल लेकही गोठल्यामुळं हाऊसबोट आणि या तलावातील अनेक बोटी किनाऱ्याच्या दिशेनं फिरवत असताना स्थानिकांना बर्फाचा थर तोडण्यामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागला. काश्मीरमध्ये सध्या इतक्या कडाक्याची थंडी पडली आहे, की इथं पाण्याचे पाईपसुद्धा गोठले आहेत.