टी १ वाघिणीला पकडता आले असते, पण `या` शिकाऱ्याने तिच्यावर गोळी झाडली
पंचनाम्याच्यावेळी अनेक धक्कादायक गोष्टी उघड
नागपूर: यवतमाळच्या पांढरकवडा भागात दहशत निर्माण करणाऱ्या टी १ या वाघिणीला शुक्रवारी रात्री वन विभागाच्या पथकाने ठार मारले. मात्र, आता यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार सर्वप्रथम या वाघिणीला बेशुद्ध करुन जेरबंद करायचा प्रयत्न झालाच नाही. तिला थेट गोळी घालून ठार मारण्यात आले, अशी माहिती पुढे येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हैदराबादहून पाचारण करण्यात आलेले प्रसिद्ध शिकारी शाफत अली खान यांचा मुलगा असगर यांनी या वाघिणीला शुक्रवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ठार केले. या मोहीमेतील शाफत अली खान यांचा सहभाग सुरुवातीपासूनच वादग्रस्त राहिला होता. त्यामुळे असगर यांच्या भूमिकेविषयी अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत.
असगर यांनी टी-१ वाघिणीला ठार मारले तेव्हा त्यांच्यासोबत वनखात्याचा पशुवैद्यकीय अधिकारी नव्हता. हे नियमाचे उल्लंघन आहे. त्यामुळे वनखात्याचे अधिकारी गोंधळले असून ते सत्य मान्य करायला नकार देत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
सर्वोच्च न्यायालयाने प्रथम वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचा प्रयत्न करावा, असे म्हटले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांत एकदाही वाघिणीला जेरबंद करण्याचा प्रयत्न झाला नाही.
तसेच या वाघिणीच्या मृत्यूचा पंचनामा करतानाही अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. वाघिणीच्या मृत शरीरात बेशुद्ध करण्यासाठी वापरण्यात आलेला डार्ट आढळून आला. मात्र, हा डार्ट बंदुकीतून झाडण्यात आला नसून वाघीण मेल्यानंतर तिच्या शरीरात खुपसण्यात आल्याच संशय आहे. जेणेकरून वाघिणीला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला, असे दाखवता येईल. त्यामुळे आता वाघिणीच्या शवविच्छेदनानंतर अधिक बाबी स्पष्ट होऊ शकतील.
याशिवाय, टी १ वाघिणीच्या मृत शरीराचे छायाचित्रे पाहून वन्यप्रेमींनी अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. ही वाघीण शोध पथकावर चाल करुन आली. त्यामुळे आम्हाला गोळी झाडावी लागली, असे वनाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, ही छायाचित्रे पाहता वाघिणीच्या शरीरातील डार्ट बंदुकीतून झाडला नसल्याचे स्पष्ट होत आहे. याशिवाय, असगर अली यांनी खूप जवळच्या अंतरावरून तिच्यावर गोळी झाडल्याचाही संशय व्यक्त करण्यात येत आहे.