नागपूर / कोल्हापूर : जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले काटोलचे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आले. यावेळी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. शहीद वीरपुत्राचे वडील रमेश सतई यांनी भडाग्नी दिला. तसेच कोल्हापूर येथील शहीद जवान ऋषीकेश रामचंद्र जोंधळे यांच्या पार्थिवावर बहिरेवाडी येथे पोलिसाच्या चार जवानांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या हवेत तीन फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


कोल्हापूरचे सूपुत्र शहीद जवान ऋषीकेश रामचंद्र जोंधळे यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलीक, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून मानवंदना दिली.



वडील रामचंद्र जोंधळे, आई कविता, बहीण कल्याणी आणि नातेवाईकांनी दर्शन घेतले. यानंतर या ठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती. चौकाचौकात फलक लावून आदरांजली वाहिली होती. ग्रामस्थ, विद्यार्थी – विद्यार्थिनी पुष्पहार आणि फुले वाहून आदरांजली वाहत होते. “अमर रहे अमर रहे ऋषीकेश जोंधळे अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम” अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा काढण्यात आली.



तर नागपूर येथे सुपुत्र शहीद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यविधी करण्यात आले. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पुष्पचक्र अपर्ण करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली, तसेच कुटुंबियाचे सांत्वन केले, संपूर्ण शासकिय इतमामात अंत्यसंस्काराचा विधी पार पडला. शहीद भूषण सतई यांना ब्रिगेड ऑफ गार्ड रेजिमेंटच्या गरुडा परेड ग्राऊंडवरुन काटोल येथे आणण्यात आले. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव घरी ठेवण्यात आले. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचे वडील रमेश सतई, आई मीराबाई सतई तसेच आप्तजनांचे सांत्वन केले.



शहीद नायक भूषण सतई यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शनासाठी संपूर्ण काटोल शहरातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काटोलकरांनी त्यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. शहीद भूषण सतई यांच्या पार्थिवावर येथील ग्रामीण रुग्णालयाजवळील मैदानावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.