विधानसभा निवडणुकीआधी शासकीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, महागाई भत्त्यात `इतक्या` टक्क्यांची वाढ
Maharastra goverment Increase in dearness allowance : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारने आणखी एक मोठं गिफ्ट दिलंय. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४६ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढ आली आहे.
Maharastra goverment DA hike 2024 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना शिंदे सरकारने आणखी एक मोठं गिफ्ट दिलं आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 46 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढ आली आहे. 1 जानेवारी 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने वाढ लागू केली जाईल. विधानसभा निवडणुकीआधी सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
दिनांक 1 जानेवारी, 2024 पासून 7 व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 46 टक्केवरुन 50 टक्के करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2024 ते दिनांक 30 जून 2024 या कालावधीतील थकबाकीसह माहे जुलै, 2024 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी, असा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वर्षातून 2 वेळा वाढ करण्यात येत असते. 1 जानेवारी 2024 मध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. 42 टक्के महागाई भत्ता होता. हा महागाई भत्ता 23 नोव्हेंबर 2023 मध्ये वाढवण्यात आला. त्यानंतर महागाई भत्ता 42 टक्क्यांवरुन 46 टक्के इतका झाला. अशातच आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यानंतर आता जुलै 2024 मध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. आता महागाई भत्ता 4 टक्क्यांनी वाढला आहे त्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50 टक्के इतका झाला आहे.
महागाई भत्ता म्हणजे काय?
जगातील अनेक घटकांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती सतत बदलत असतात. त्यामुळे महागाई वाढत असते. कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करता यावा यासाठी महागाई भत्त्याची निर्मिती करण्यात आली होती. केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि निवृत्तिवेतनधारक यांना महागाई भत्ता दिला जातो. दर सहा महिन्यांनी महागाई भत्त्याचा आढावा घेऊन त्यात वाढ केली जाते.