Jitendra Awhad Attack Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर बारामती दौऱ्यात टीका केली होती. माझी शेवटची निवडणूक आहे, असं सांगितलं जाऊन भावनिक केलं जाईल, पण कधी शेवटची असणार काय माहित? असा टोला अजित पवार (Ajit Pawar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लगावला होता. अजित पवार यांच्या या वक्तव्यावरून राज्याचं राजकारण तापल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता याच विधानावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत सडकून टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?


बारामतीत बोलताना अजित पवारांना हद्दच केलीये. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वाट बघणं, याचना करणं कितपत योग्य आहे? आपल्या चुलत्यांच्या मृत्यूची वाट पाहणं हे काय राजकारण आहे का? अजितदादा... असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. त्यांचं हे वक्तव्य माणुसकीला शोभणारं तरी आहे का? याचा विचार त्यांनी स्वत: करावा, असंही आव्हाड म्हणतात. बारामतीकर अशा माणसाला त्याची जागा दाखवतील. ते शरद पवार आहेत, त्यांचा शेवट नाही. ते महाराष्ट्राच्या राजकारणात अजरामर राहतील, असं म्हणत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर तोफ डागली.


आधी आपली उंची बघावी आणि शरद पवार कुठे आहेत अन् तुम्ही कुठंय ते पाहावं. देशातील अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग अशा मोठ्या व्यक्ती देखील शरद पवारांचं नावं काढतात. लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची... असं म्हणत आव्हाडांनी संताप व्यक्त केलाय. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसलं जाईल याची आज तुम्ही वाट बघता, असंही जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.


अधिक वाचा - '...तेव्हा मी कोणाच्या बापाचे ऐकणार नाही'; लोकसभा निवडणुकीवरुन अजित पवारांचा इशारा


दरम्यान, राष्ट्रवादीच नाही तर आता काँग्रेसने देखील अजित पवारांना पट्टीत घेतलंय. काकांच्या भरोशावर जे मोठे झाले त्यांनी काकाला शिव्या घालत असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्याने संभ्रमित झालेल्या कार्यकर्त्यांना भावनिक विचार करू नये, असा सल्ला अजित पवार यांनी बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांना दिला आहे.