Maharasra Politics Over Lok Sabha polls : महाराष्ट्रात पहिल्या तीन टप्प्यात अपवादात्मक प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडलं. मात्र चौथा टप्पा तुलनेनं अधिक गोंधळाचा ठरला. गोंधळाची सुरुवात झाली मतदानाच्या पूर्वसंध्येला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या पूर्वसंध्येला निलेश लंके आणि विखे समर्थक एकमेकांमध्ये भिडले. पारनेर तालुक्यातल्या वडझिरे गावामध्ये पेट्रोल पंपावर लंके आणि विखे समर्थकांमध्ये तुफान हाणामारी झाली. भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप लंके समर्थकांनी केला. तर आपली गाडी फोडल्याचा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदेंनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा राडा शांत होत नाही तोच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पैसे वाटले गेल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय. उन्हाळ्यातही पैशांची धुवांधार बरसात होतेय. गावागावात पाकिटं वाटली जात आहेत असा आरोप रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांच्या या आरोपांना अहमदनगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखे-पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.



तर शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर शहरात बोगस मतदान होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला. मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीने मतदान करुन स्वाक्षरी केल्याचा आरोप करण्यात आला. मतदान करण्यासाठी गेलेल्या मतदारानेच बोगस मतदान होत असल्याचा प्रकार उघड केला. हुतात्मा राजगुरु विद्यालयातील मतदान केंद्रातील हा धक्कादायक प्रकार आहे. यासंदर्भात शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रतिनिधींनी केंद्र प्रमुखांना जाब विचारलाय.


अमोल कोल्हेंनी आणखी एका प्रकरणात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. जुन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक 14 मध्ये आमच्या पोलिंग एजंटला उपस्थित राहण्यास अधिकारी मज्जाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच मतदान केंद्र क्रमांक 235 मध्ये VVPAT मशीन बंद असल्याचीही तक्रार अमोल कोल्हेंनी केलीय.



अमोल कोल्हेंनी आणखी एक तक्रार केली..सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्तेच पोलिंग एजंट बनून मतदान केंद्रात मनमानी कारभार करत असल्याचा आरोप अमोल कोल्हेंनी केला. मांजरीमधला एक व्हिडिओही त्यांनी शेअर केला. संबंधित पक्षाच्या राजकीय कार्यकर्त्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी कोल्हेंनी केली.


तसं पाहिलं तर महाराष्ट्रात केवळ 11 मतदारसंघातच चौथ्या टप्प्यासाठी मतदान होतं. मात्र पैसेवाटप, बोगस मतदान, कार्यकर्त्यांमध्ये राडा, अशा अनेक घटनांनी चौथा टप्पा गाजताना दिसला.