Maharastra Politics : राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांना उधाण आलं आहे. महायुती सरकारवर चहुबाजूने टीका होत असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यामुळे विरोधकांकडे आणखी एक आयती संधी गवसली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या एका वक्तव्यामुळे राजकारणातून मोठ्या प्रमाणात फडणवीसांवर टीका होत आहे. शिवरायांचा अवमान आम्ही खपवून घेणार नाही, असं म्हणत महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले अन् फडणवीसांची कोंडी केली. अशातच आता राष्ट्रवादी (SP) चे आमदार रोहित पवार यांनी फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.


रोहित पवार काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल सत्तेचे महत्वाचे केंद्र असलेल्या सुरतेवर स्वारी करून सुरत लुटले, एकदा नाही तर दोनदा लुटले. का लुटले? कशासाठी लुटले? हे छत्रपतींच्या इतिहासाशी छेडछाड करून नेहमीच छत्रपतींना कमी लेखण्याचा प्रयत्न करणाऱ्या जेम्स लेन समर्थकांना कदापि कळणार नाही, पण तरीही सांगतो ही लुट राजकीय डावपेच होता आणि यात सर्वसामान्य नागरिकांना किंवा गोरगरीब जनतेला किंचितसाही धक्का लागू दिला नाही, असं रोहित पवार म्हणाले.


आज महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योग, मुंबईचे आर्थिक महत्व कमी करण्याचे होत असलेले प्रयत्न, राज्याच्या अस्मितेची होणारी छेडछाड अशा वेगवेगळ्या माध्यमांतून राज्यसरकार त्यांच्या मालकांना खूष ठेवण्यासाठी त्याच सुरत लुटीची परतफेड तर करत नाही ना? अशा महाराष्ट्रद्रोह्यांना कसे हद्दपार करायचे, हे महाराष्ट्राला चांगलेच माहीत आहे, याचा विसर कुणीही पडू देऊ नये, असं म्हणत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. 


देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते?


स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी विचारला होता.


दरम्यान, मध्यप्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोझरने हटवला. याची माफी काँग्रेस मागणार का? कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? असा सवाल देखील फडणवीसांनी विचारला होता. मात्र,  छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली नाही, असं वक्तव्य केल्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.