Ladki bahin Yojana : मध्य प्रदेशमधील लाडली बेहणा योजनेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी या योजनेची घोषणा केली होती. अशातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून सामनातून सरकारवर निशाणा साधण्यात आलाय. अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा. तुमची ही सत्तेची वारी शेवटचीच. जनता तुम्हाला सत्तेपासून कायमचे अनाथ करणार असा निशाणा साधण्यात आलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी-शर्तीचा गुंता राज्यातील लाखो भगिनी कसा सोडवू शकतील? पुन्हा महागाईचा वणवा तुम्हीच पेटवलाय. त्यामुळे तुमची ही जेमतेम दीड हजाराची 'फुंकर' भगिनींना कितपत दिलासा देईल? असे सवाल उपस्थित करत सरकारवर टीका केलीय.


आणखी वाचा - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ कसा घेता येणार? अर्ज कुठे आणि कसा भरायचा? जाणून घ्या सर्व काही


'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' या नावाने एक योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली. बरे, लाडक्या बहिणींची चिंता कोणी करावी? तर ज्या भावाने बारामतीत लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा धुळीस मिळावी म्हणून कोणतीही कसर सोडली नाही त्याने? पुन्हा या लाडक्या बहिणींचे हजारो भाऊ पुण्या- नाशकात ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी-शर्तीचा गुंता राज्यातील लाखो भगिनी कसा सोडवू शकतील? हा प्रश्न देखील विचारला आहे.


दरम्यान, पुन्हा महागाईचा वणवा तुम्हीच पेटविला आहे. त्यामुळे तुमची ही जेमतेम दीड हजाराची 'फुंकर' भगिनींना कितपत दिलासा देईल? हाही प्रश्न आहेच. या प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून सत्तेतील घटक पक्ष श्रेय घेत स्वतःची छाती पिटत आहेत. लोकसभेप्रमाणेच उद्याच्या विधानसभा निवडणुकीतही जनता तुम्हाला सत्तेपासून कायमचे 'अनाथ' करणार आहे. अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा, तुमची ही 'सत्तेची वारी' शेवटचीच आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर केली आहे.