Supriya Sule Warning to Ajit Pawar : बारामतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी वहिनी सुनेत्रा पवारांना पराभवाचा फुल्ल आहेर दिला. सून की लेक अशा पवार घरातल्या कौटुंबिक संघर्षात बारामतीकरांनी लेकीच्या बाजूनं कौल दिला आणि सुप्रिया सुळेंनी विजयाचा चौकार लगावला. आता निवडणूक जिंकल्यावर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच शिंगावर घ्यायचं ठरवलंय. निवडणूक काळात कार्यकर्त्यांना धमकावणं, ऐन मतदानाच्या दिवशी वेल्ह्यातील पीडीसीसी बँक 24 तास उघडी असणं, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंची दमदाटी, काम करा अन्यथा बघून घेऊ अशी अजितदादांची भाषा, मत दिलं तरच निधी मिळेल, अशा अनेक तक्रारी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाविरोधात आल्या. त्याचा हिशोब चुकता करायचा विडा सुप्रिया सुळेंनी आता उचललाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजितदादांनी नाती बाजूला ठेवून राजकारणाचा खेळ खेळल्यानं आता सुप्रिया सुळेही अजित पवारांच्या साम्राज्याला सुरुंग लावायला सज्ज झाल्यात. अगदी दूध संघापासून ते ग्रामपंचायत, अगदी विधानसभा निवडणुकीत आपण शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीनं उतरणार अशी घोषणाच  सुप्रिया सुळेंनी केली आहे.


अजितदादांचा विषय निघाला की, सुप्रिया सुळे थेट बोलणं टाळायच्या. मात्र आता त्यांनी पदर खोचून अजितदादांना आव्हान द्यायचं ठरवलंय. बारामतीच्या खासदारकीवर डोळा ठेवणाऱ्या, त्यासाठी साम, दाम, दंड भेद वापरणाऱ्या आपल्याच दादाला बारामतीबाहेर काढण्याचा चंग ताईनं बांधल्याचं दिसतंय. लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना धूळ चारत सुप्रिया सुळेंनी पुन्हा बाजी मारली. मात्र त्यांना डिवचल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजितदादांना आता सुप्रियाताईंशी दोन हात करावे लागणार हे नक्की. बारामतीत विजय झाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या आईची भेट घेऊन आशीर्वाद घेतली. निवडून आल्यानंतर सुप्रिया सुळे बारामतीत आहेत. त्यावेळी त्यांनी भेटीगाठी घेताना अजित पवारांच्या आई आशाकाकींची भेट घेतली.


दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला केंद्रीय मंत्रिमंडळात प्रत्येकी 1 मंत्रिपद दिलं जाणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून समजतंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची भाजप नेतृत्वाशी चर्चा झाली. त्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 मंत्रिपद देण्याचं निश्चित झाल्याचं, सूत्रांनी सांगितलंय.