प्रवीण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : महावितरणवाले कधी काय करतील, याचा नेम नाही. सध्या भंडारा जिल्ह्यात महावितरणाच्या कारभारामुळे
नागरिक प्रचंड हैराण आहेत. विजेचा वापर केला जात नसतानाही महावितरण हजारो रुपयांची बिलं पाठवतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जमिनदोस्त घरांना हजारोंची बिलं
गेल्यावर्षी वैनगंगा नदीला आलेल्या महापुरात भंडाऱ्यातील पिपरी गाव बुडालं होतं. गोसेखुर्द धरणामुळं पुनर्वसित झालेलं हे गाव. घरातले विजेचे इलेक्ट्रिक मीटर देखील पुराच्या पाण्यात वाहून गेले. या बंद पडलेल्या घरांमध्ये सध्या स्मशानशांतता आहे. घरं जमीनदोस्त झाली आहेत. 


मात्र महावितरण वीज कंपनी या वापरात नसलेल्या घरांची वीजबिलं दर महिन्याला न चुकता पाठवत आहे. पूरग्रस्त गावकऱ्यांनी नवीन ठिकाणी तात्पुरती घरं बांधलीत. तिथं इलेक्ट्रिक मीटर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. पण थकीत वीजबिलं आधी भरा, मग नवीन मीटर देऊ, असं महावितरणने गावकऱ्यांना सांगितलं आहे. विजेचा वापर न करताच, 30 हजार रुपयांची बिलं आली. ती कशी भरायची, अशी चिंता आता गावक-यांना सतावतेय.. 



पूरग्रस्त गावकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांना चुकीची वीजबिलं पाठवून वसुलीचा शॉकिंग कारभार महावितरणनं सुरू केला आहे. ऊर्जामंत्र्यांनी यात लक्ष घालून, अशा उलट्या काळजाच्या महावितरण अधिकाऱ्यांनाना शॉक देण्याची गरज गावकरी व्यक्त करत आहेत.