Ramdas Kadam Exclusive: `राक्षसी महत्वाकांक्षा असलेली युती तोडा; तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू`
Ramdas Kadam Vs Ravindra Chavan: कोकणात महायुतीतील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय.
Ramdas Kadam Vs Ravindra Chavan: कोकणात महायुतीतील वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळतंय. रवींद्र चव्हाण कुचकामी मंत्री आहेत, असा थेट हल्लाबोल रामदास कदम यांनी केलाय.. देवेंद्र फडणवीसांनी चव्हाणांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी रामदास कदमांनी केली. तर दापोलीमध्ये भाजप कार्यकर्ते सहकार्य करत नासल्याचा आरोप त्यांनी केलाय. यासाठी फडणवीसांकडं तक्रार केल्याचंही त्यांनी म्हटलंय.कोकणातील रस्त्यांवरून रामदास कदम आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय..
गेल्या 14 वर्षापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नाहीय. चाकरमान्यांचे हाल होतायत. समृद्धी महामार्ग 3 वर्षात होतो. मग हा महामार्ग का नाही? असा प्रश्न त्यांनी विचारला. रविंद्र चव्हाण आणि रामदास कदम यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. रवींद्र चव्हाणांना शिवसेनेची एलर्जी आहे. अशी टीका रामदास कदमांनी केली. दापोलीत मुस्लिम आणि बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणात आहेत. लोकसभेत सर्व मुस्लिम बांधवांनी पंतप्रधान मोदींच्या विराधात मतदान केल्याचे ते म्हणाले. आम्ही 35 वर्षे घडाळ्याच्या विरोधात मतदान केलं. त्यामुळे आमच्या लोकांची अडचण झाली. मी जिवाच रान केलं. रात्रंदिवस काम केलं. याला सुनील तटकरे साक्षीदार आहेत. आम्ही काम केलं नसतं तर 30 हजारने कमी मतदान झाल असतं असे ते म्हणाले. पण विधानसभेत चित्र वेगळ असेल. पुणं आमचं, नाशिक आमचं,ठाणं आमचं असं चित्र लोकसभेला होतं. युतीमध्ये तुमच्या राक्षसी महत्वाकांक्षा असतील तर युती तोडून स्वतंत्र लढा,असे आव्हान रामदास कदमांनी दिले आहे.
रविंद्र चव्हाणांना शिवसेनेची एलर्जी
मी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून माझी नाराजी व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीसांना मी हे पत्र देईन. ते काय कार्यवाही करतात ते पाहीन. 2019 मध्ये युती असताना दापोलीच्या भाजपच्या लोकांनी माझ्या मुलाला मतदान केलं नाही. ही बाब मी फडणवीसांच्या निदर्शनास आणून दिली. पण यात काही फारसा बदल झालेला दिसत नाही. मुंबई-गोवा महामार्गामुळे आमचे हाल होतायत. आम्ही काय पाप केलंय? 14 वर्षे का लागतात? याचं उत्तर आम्हाला कोण देईल? आमच्या व्यथा आम्ही कुठे मांडायच्या? रविंद्र चव्हाण हा माणूस युती कशी तुटेल हे पाहतोय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पनवेलपासून राजापूरपर्यंत रोडने प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केलंय. रविंद्र चव्हाण चुकत असले तरी मला चुकता येणार नाही. हे थांबल नाही तर मी ते पत्र मीडियासमोर देईन, असे रामदास कदम म्हणाले. रविंद्र चव्हाण एकनाथ शिंदेंच्या एकाही सभेला गेले नाहीत. उदय सामंतांच्या मतदार संघातही त्रास देतायत. याला शिवसेना पक्षाची एलर्जी आहे.या माणसाचा बंदोबस्त व्हायला हवा., असे रामदास कदम म्हणाले.
रवींद्र चव्हाणांचा पलटवार
सरकारच्या माध्यमातून मी हजारो कोटींचा निधी त्यांच्या मतदारसंघात दिलाय. यासाठी त्यांनी माझे आभार मानले पाहिजेत. मी सौजन्य सोडलं तर अतिशय वाईट पद्धतीने वागायला तयार आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात मंत्री होते. त्यांनी एक काम केलेलं दाखवाव. उगीच मोठमोठ्या हुशाऱ्या करतात. उद्धव ठाकरे त्यांना उगीच महत्व देत होते. आता ते चालणार नाही, असा पलटवार रवींद्र चव्हाणांनी केला.