माहिम विधानसभेचा गड कोण राखणार? दोन शिवसैनिक तर एक मनसैनिकात रंगणार सामना
Mahim Vidhansabha Election 2024 : निवडणुकीत माहिम विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि याच कारण म्हणजे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे माहिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. माहिममध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकरही निवडणुक लढवण्यावर ठाम आहेत.
कृष्णात पाटील, मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असून 29 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. या निवडणुकीत माहिम विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय आणि याच कारण म्हणजे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) माहिम मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. माहिममध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सदा सरवणकरही निवडणुक लढवण्यावर ठाम आहेत.
सरवणकरांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून आता यांच्या स्पर्धेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश सावंत सुद्धा मैदानात उतरलेत. या तीन सैनिकांमध्ये माहिमची तिरंगी लढत होणार आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड महायुती करणार अशी चर्चा होती. मात्र सदा सरवणकर निवडणुक लढवण्यावर ठाम असल्याने यांच्यात सामना होणं अटळ आहे.
माहिम विधानसभा मतदारसंघात मागील 3 निवडणुकांमध्ये शिवसेना विरुद्ध मनसे अशीच मुख्य लढत पाहायला मिळाली होती. 2009 मधील निवडणुकांमध्ये मनसेचे नितिन सरदेसाई यांना यश मिळाले होते तर 2014 आणि 2019 मध्ये येथून शिवसेनेचे सदा सरवणकर विजयी झाले होते. मात्र शिवसेनेत फूट झाल्यावर हे विधानसभेची पहिली निवडणूक आहे. त्यामुळे दोन शिवसेनेचे 2 उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी माहीमचा सामन्याचं चित्र बदलण्याची शक्यता वर्तवली जातेय. तरीही मनसे अध्यक्षांचाच मुलगा मैदानात उतरल्याने माहीमची ही निवडणुक मोठी चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार आहे.
माहिम मतदारसंघात 45 हजारांच्या आसपास मराठी, 33 हजारांच्या जवळपास मुस्लिम आणि 9 हजारांच्या आसपास ख्रिश्चन मतं आहेत. 2019 साली सदा सरवणकर हे माहिम मतदारसंघातून विजयी झाले होते. तेव्हा त्यांच्या विरोधात मनसेचे संदीप देशपांडे आणि काँग्रेसचे प्रविण नाईक होते. या लढतीत मनसेचे संदीप देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर होते. 2014 साली देखील सदा सरवणकर यांचा विजय झाला होता. तर, 2009 साली माहिममधून नितीन सरदेसाई विजयी झाले होते. माहिममधून नितीन सरदेसाई यांना 48,734 मतं मिळाली होती. तर काँग्रेसकडून निवडणुक लढवलेल्या सदा सरवणकर यांना 39,808 मतं मिळाली होती.