मुंबई : काही दिवसांपूर्वी वांगणी रेल्वे स्थानकावर पॉईंट मॅनने (Railway Pointsman) एका चिमुकल्याचे जीव वाचवले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. चिमुकल्याचा जीव वाचवणारा तरुण मयुर शेळके (Mayur Shelke) याचं सगळ्याच स्तरातून कौतूक होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, प्रत्येकजण त्याच्या धैर्याचे कौतुक करीत आहे. वांगणी स्टेशनवर ( Vangani Railway Station)ही घटना 17 एप्रिल रोजी घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयूरने दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक म्हणून जावा मोटरसायकलने त्याला एक नवीन बाईक भेट देण्याची घोषणा केली. क्लासिक लीजेंड्सचे प्रमुख अनुपम थरेजा यांनी ही माहिती दिली आहे. क्लासिक लीजेंड्स महिंद्राच्या मालकीचा एक ब्रँड आहे, ज्या अंतर्गत जावा मोटारसायकली विकल्या जातात. हा व्हिडिओ शेअर करताना रेल्वे मंत्रालयाने म्हटले की, मुलाचा जीव वाचवण्यासाठी पॉईंटमॅनने आपला जीव धोक्यात घातला. आम्ही त्याच्या धैर्य आणि कर्तव्याला सलाम करतो.



व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगा अचानक रेल्वे ट्रॅकवर जावून पडतो. समोरुन वेगाने एक्सप्रेस येत आहे. मुलाची आई अंध असल्याने तिला मुलांला वर घेता येत नव्हतं. त्यावेळी येथे कर्तव्यावर असलेल्या पॉईंटमन मयुर शेळके धावत आला. त्याने या मुलाचा जीव वाचवला. ही घटना अंगावर काटा आणणारी आहे.