Bandra-Worli Sea Link accident : मुंबईत दिवाळीची धामधुम सुरु असताना गुरुवारी रात्री उशिरा वांद्रे वरळी सी लिंकवरील टोल प्लाझावर मोठा अपघात झाला. सी लिंकवर काही वाहने टोलनाक्यावरून जात असताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने एकामागून एक अनेक वाहनांना धडक दिली. हा अपघात एवढा मोठा होता की यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले. भरधाव वेगात असलेली कार वरळीहून वांद्र्याच्या दिशेने येत होती. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत नऊ जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेनंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. टोल बुथवर बसलेल्या कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. कारला धडकलेल्या कारचेही नुकसान होऊन ती बंद पडली. त्याच्या चालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे.



कसा झाला अपघात?


माध्यमांच्या वृत्तानुसार, वेगात येणाऱ्या कारच्या चालकाने सी लिंकवर दुसऱ्या वाहनाला धडक दिली. यानंतर त्याने पकडले जाऊ नये म्हणून गाडीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सहा गाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात कार चालकालाही दुखापत झाल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. त्याची कार जप्त करण्यात आली आहे.