धुळे: औरंगाबाद-शहादा एसटी बसचा रविवारी रात्री दोंडाईचा - निमगुळ रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एसटीतील १३ जणांचा मृत्यू झाला आहे. निमगुळ परिसरात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार, एसटीची बस औरंगाबादहून शहादाकडे येत होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या मालवाहू कंटेनरने एसटीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की बसची एक बाजू पूर्णपणे कापली गेली असून त्याचा चेंदामेंदा झाला आहे. 


औरंगाबादहून शहादाला जाणाऱ्या या बसमध्ये एकूण ४४ प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर अनेक प्रवासी बसमध्येच अडकून पडले होते. ग्रामस्थांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थांनी रिक्षा, कार, रुग्णवाहिका मिळेल ते वाहन घेऊन असे, आवाहन मंत्री जयकुमार रावल यांनी केले होते. यानंतर ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. 


 एसटीतील १३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर २० जण जखमी झाले आहेत. यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सर्व जखमींना उपचारासाठी दोंडाईचा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व मृत प्रवासी शहादा तालुका आणि शहरातील रहिवासी आहेत.



दरम्यान, प्राथमिक चौकशीत एसटी बसच्या चालकाने मद्यप्राशन केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळेच नियंत्रण सुटून बस कंटेनरवर जाऊन आदळल्याचे समजते.