सातारा : कोयना आणि कृष्णा नदीला मोठा पूर आल्याने सातारा-कराड शहराला कृष्णा आणि कोयना नदीच्या पाण्याने वेढले आहे. कोयना, धोम धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असल्याने कृष्णा आणि कोयना नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. त्यामुळे कराडमधील प्रीतिसंगम घाट, दत्त चौक, पाटण कॉलनी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले आहे.  


सांगली शहर जलमय 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरामुळे सांगली शहर जलमय झालंय. शामरावनगर, पत्रकार नगर, टिळक चौक, कोल्हापूर रस्ता, सागंलीवाडीसह अनेक उपनगरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय. सांगली जिल्ह्यातील ४३ हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आलं असून ११ हजार ७०० हेक्टर पिकांचं नुकसान झालंय. कृष्णा नदीची पाणी पातळी ५३ फूट १० इंच इतकी असून आतापर्यंतच्या सर्वात जास्त पाणी पातळीची नोंद झाली आहे. एनडीआरएफची चार पथकं आणि टेरीटोरियल आर्मीचा रिलिफ कॉलम, महसूल, पोलीस, महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायती या सर्व यंत्रणेद्वारे पूरग्रस्तांना मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार 


मुसळधार पडत असलेला पाऊस आणि पंचगंगा नदीची वाढत असलेली पाणी पातळी यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी ही ४३ फूट असून सध्या पंचगंगा नदी ५४ फूट १० यांचा वरून वाहत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीने रौद्ररूप धारण केल आहे..तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर देखील ६ फुटातून अधिक पाणी आहे..त्यामुळे पुणे बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. जिल्हा प्रसासनाच्या मागणीनंतर एनडीआरएफसह लष्कराचे पथक अखेर कोल्हापूरमध्ये दाखल झाली आहे. जिल्ह्यातील विशेषत: प्रयाग चिखली या पूरग्रस्त भागात सुरुवातीला स्थलांतरास सुरुवात करणार आहे.


पुरात अडकले हजारो लोक


काल खराब वातावरणामुळे नेव्हीचे विमान आणि गोवा कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर कोल्हापूरमध्ये पोहोचू शकले नाही. पण आज नेव्हीच्या ५ बोटी आणि पथक हे एअरफोर्सच्या विमानाने आज कोल्हापूरमध्ये दाखल होणार आहे. त्यामुळे किमान आज तरी या पुरात अडकलेल्या हजारो लोकांची सुटका होईल अशी अपेक्षा आहे.