निलेश वाघ, योगेश खरे, झी मीडिया, मालेगाव : मालेगावमध्ये कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १००च्या वर गेला आहे. तरीही तिकडे नागरिक सुधारायचं नाव घेत नाहीत. आतातर मालेगावमध्ये धक्कादायक आणि संतापजनक प्रकार घडला आहे. मालेगावातल्या एका पुलावर जमावाने पोलिसांवरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सकाळीच सकाळी शहरामध्ये मोठी धुमश्चक्री झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालेगावातील किल्ला परिसर आणि संगमेश्वरला जोडणारा अल्लामा इक्बाल पुलाच्या परिसरात अनेक लोक रस्त्यावर राहतात. सोशल डिस्टन्सिंगही पाळलं जात नाही. मास्कही घातला जात नाही. रस्त्यावर हे लोक फिरायला लागले की पोलीस दंडुके घेऊन त्यांना पिटाळून लावतात. याचाच राग येऊन जमावाने पोलीस चौकीवरच हल्ला केला.


पोलिसांवर हल्ला करण्यासाठी जमाव आला होता. या जमावाकडून दगडफेक आणि तोडफोडही करण्यात आली. पण पोलिसांची मोठी कुमक आल्यामुळे नंतर हे हल्लेखोर पळून गेले. 


मालेगावात याआधाही दोनवेळा सामान्य रुग्णालयात हल्ला झाला होता. त्यात एक अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते. आमदार मुफ्ती मोहम्मद यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालेगावातल्या आशा वर्कर्स, ऍम्ब्यूलन्स चालक अशा अनेकांवर गेल्या काही दिवसांमध्ये हल्ले झाले आहेत. 


मालेगावात कोरोनाच्या रुग्णांनी शंभरी गाठली आहे. इथली सुरक्षा व्यवस्था ही मोठा चिंतेचा प्रश्न आहे. कितीही आवाहन केलं, दरडावलं तरी लोक घरी बसायला तयार नाहीत. आता प्रशासनाने अशा लोकांवर तातडीने कठोर पावलं उचलायची गरज आहे.