त्रिपुरातली अफवा महाराष्ट्रात तणाव... 3 जिल्ह्यांमध्ये दगडफेक आणि तोडफोड
त्रिपुरातील अफवेनंतर महाराष्ट्राचं वाढलं टेन्शन... तीन जिल्ह्यांमध्ये तणावाचं वातावरण... तुफान दगडफेक आणि तोडफोड पाहा व्हिडीओ
मालेगाव: त्रिपुरातील हिंसाचाराच्या कथित घटनेच्या अफवेनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटले आहेत. कुठे दगडफेक तर कुठे जाळपोळ अशा घटना घडत आहेत. मालेगाव, अमरावती आणि नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण आहे. या ठिकाणी दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली.
अमरावतीमध्येही मुस्लीमांनी मोर्चा काढला. त्यांनी शहरातील 20-25 दुकानांवर दगडफेक केल्याची माहिती मिळाली आहे. दगडफेक आणि तोडफोडीची घटना CCTVमध्ये कैद झाली. शहरात तणावाचं वातावरण आहे. या प्रकरणी सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून करवाई करण्यात येणार आहे.
त्रिपुरा येथील घटनेचे नांदेड मध्ये पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. मुस्लीम संघटनांनी बंदचे आवाहन केलं होतं. दुपारी अडीचच्या सुमारास शिवाजीनगर भागात काही तरुणांनी सुरू असलेल्या दुकानांवर दगडफेक केली.
नांदेडमध्ये 5 ते 6 दुकानांचे यात नुकसान झालं आहे. या भागातून जाणाऱ्या एका इनोव्हा गाडीवर तुफान दगडफेक करण्यात आली. भाग्यनगर आणि देगलूर नाका भागात तुफान दगडफेक झाली.
नांदेडमध्ये 5 ते 6 गाड्यांवर दगडफेक झाली, एक दुचाकीही जाळण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या.
त्रिपुरातील हिंसाचाराच्या कथित घटनेचे मालेगावात शुक्रवारी जोरदार पडसाद उमटले. मालेगावपाठोपाठ अमरावती, नांदेड आणि यवतमाळमध्ये देखील हिंसक प्रतिक्रिया उमटल्यात. त्रिपुरात मशीद जाळल्याच्या कथित घटनेच्या निषेधार्थ मालेगावात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक गालबोट लागलं.
मोर्चेक-यांनी दगडफेक करत अनेक दुकानांची तोडफोड केली. त्रिपु-यात अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सुन्नी जमियतुल उलेमा व रजा अकॅडमी संघटनेतर्फे मालेगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र या बंदला हिंसाचाराचं गालबोट लागलं.
मुस्लीम संघटनांनी मोर्चाची परवानगी मागितली होती. मात्र पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. त्यामुळं संतापलेल्या आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.