मालेगावातून लाखोंचा `कुत्ता गोळी`चा साठा जप्त, दोघांना अटक
मालेगाव पोलिसांनी कुत्ता गोळीविरोधात मोहीम उघडली असून सातत्याने कुत्ता गोळी विरोधात कारवाई केली जात असते
निलेश वाघ, झी २४ तास, मालेगाव : मालेगावच्या गुन्हेगारी जगतात नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कुत्ता गोळी व नशेच्या औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. एक लाख ७१ हजार रुपयांच्या कुत्ता गोळीसह नशेच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मालेगाव शहरातील तरुण पिढी मोठ्या प्रमाणावर कुत्ता गोळीच्या आहारी गेली आहे. 'अल्प्राझोलम' नावाच्या या गोळीचा मालेगावच्या गुन्हेगारी जगतात बोलबाला आहे. या गोळीच्या नशेत गुन्हेगार मोठे मोठे गुन्हे करीत असल्याचे पुढे आले आहे. मालेगाव पोलिसांनी कुत्ता गोळीविरोधात मोहीम उघडली असून सातत्याने कुत्ता गोळी विरोधात कारवाई केली जात असते.
अशी केली पोलिसांनी कारवाई
मालेगावच्या नूर हॉस्पिटल भागात कुत्ता गोळी व नशेच्या औषध विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आशपाक अहमद अब्दुल रउफ हा इसम एका पिशवीत बेकायदा गुंगीच्या गोळ्या व कोरॅक्स नावाचे औषधं विकताना आढळून आला. त्याची अधिक चौकशी केली असता जुना आझाद नगर भागातील सैलानी चौकातून ही औषधे घेतल्याचं त्यानं कबूल केली. पोलिसांनी तत्काळ सैलानी चौकात छापा मारत शेख वसीम अब्दुल खालिक याच्याकडे मोठ्या प्रमाणात कुत्ता गोळी व नशेच्या औषधांचा मोठा साठा आढळून आला.
पोलिसांनी दोघांकडून एकूण १ लाख ७१ हजार रुपायांची कुत्ता गोळी व नशेची औषधे जप्त केली. आत्तापर्यंतची कुत्ता गोळीविरोधातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. कुत्ता गोळी विकणाऱ्या दोघांनाही अटक केल्याची माहिती मालेगावचे डीवायएसपी रत्नाकर नवले यांनी दिलीय.
कुत्ता गोळीची झिंग
मानसिक आजार व झोप ने येणे या रुग्नांसाठी अल्प्रालोझम ही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्यानं अल्प प्रमाणात देण्यात येते. मात्र या गोळीचा वापर नशेसाठी वापर होत असल्याचं याआधीही अनेकदा समोर आलं आहे.
- कुत्ता गोळी हा एक नशेचा स्वस्त प्रकार आहे.
- आपण काय करतोय, याचं भानही या गुन्हेगारांना नशेच्या भरात राहत नाही.
- कुत्ता गोळी नावाने संबोधल्या जाणाऱ्या या ड्रग्जच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम शरीरावरही वेगवेगळ्या पद्धतीनं दिसून येतात
पोलिसांसमोर आव्हान
नाशिक जिल्ह्यात कुत्ता गोळीविरोधात दुसरी कारवाई आहे. कमी पैंशात जास्त नशा देणाऱ्या कुत्ता गोळीच्या नशेच्या गर्तेत तरुणाई ओढली जात आहे. मालेगावात तर कुत्ता गोळी सेवन करण्याचे प्रमाण मोठे आहे. मालेगावात प्रथम एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुत्ता गोळीचा साठा पोलिसांना जप्त करण्यात यश आले आहे. असे असले तरी पुढील काळात कुत्ता गोळी विक्रीचे रॅकेट उघड करून कुत्ता गोळी विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.