मालेगावातून खळबळजनक बातमी! जमावाकडून दगडफेक...बंदला गालबोट
मालेगावात खळबळ, जमवाकडून मोठी दगडफेक... रस्त्यावर दगडांचा खच
निलेश वाघ, झी 24 तास, मालेगाव: त्रिपुरातील हिंसाचाराच्या कथित घटनेचे मालेगावात तीव्र पडसाद उमटले. त्रिपुरात मशीद पाडल्याच्या अफवेनं मालेगावात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक गालबोट लागलं आहे. मोर्चेक-यांनी दगडफेक करत अनेक दुकानांची तोडफोड केली. त्रिपु-यात अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या हल्ल्याच्या निषेधार्त हा मोर्चा काढण्यात आला होता.
या मोर्चात जवळपास 10 हजार लोक सहभागी झाले होते. सुन्नी जमियतुल उलेमा व रजा अकॅडमी संघटनेतर्फे मालेगाव कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील अनेक गल्लीत निषेधाचे काळे ध्वज लावण्यात आले.
मालेगावात यंत्रमाग, दुकानं, हॉटेल या बंद मध्ये सहभागी झाले होते. मालेगाव पाठोपाठ राज्याच्या इतर भागातही त्रिपुरातील कथित घटनेचे पडसाद उमटू लागल्याचं पाहायला मिळत आहे. एवढ्य़ा मोठ्य़ा प्रमाणात दगडफेक करण्यात आली की रस्त्यावर दगडांचा खच पडला आहे.
या मोर्चासाठी मालेगाव पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. दुपारी 3 वाजेपर्यंत सर्वकाही शांत होतं. मात्र त्यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्यानं परिसरात तणावाचं वातावरण आहे.