सातारा : जिल्ह्यातील कराडमधील मलकापूर नगरपरिषदेची होणारी निवडणूक भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली आहे. मलकापूर नगरपरिषदेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असा सामना रंगला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक मनोहर शिंदे यांच्या पॅनेल विरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समर्थक भाजपचे डॉ. अतुल भोसले यांनी स्वत:चे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. 


जोरदार आरोप-प्रत्यारोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अतुल भोसले यांनी मलकापूर नगरपंचायतीची सत्ता खेचून आणण्याचा चंगच बांधला आहे. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचा प्रचार जोरदार सुरु आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मलकापूर नगरपंचायतीच्या रणधुमाळीत अतुल भोसले यांनी केलेल्या या टीकेमुळे राजकीय गरमागरमी सुरु झाली आहे. वैयक्तिक स्वार्थासाठीच नगरपरिषदेत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे अतुल भोसले यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर भाजपच्या महादेव जानकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या सभा भाजपला घ्याव्या लागतात यावर देखील शिंदे यांनी टीका केली आहे. 


'भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली'


नगरपरिदेच्या विकासात्मक कामामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रयत्न कधी केला नसताना फक्त वैयक्तिक स्वार्थासाठीच संपूर्ण मलकापूरला वेठीस ठरण्याचे काम अतुल भोसले करत असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मलकापूर नगरपालिकेची निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम मानली जात आहे. पृथ्वीराज चव्हाणांना स्वत:चा गड राखायचा आहे. तर डॉ. अतुल भोसलेंना मलकापूर गड स्वत:कडे खेचून आणायचा आहे. भाजपनेही अतुल भोसलेंच्यामागे मोठी ताकद उभी केली आहे. यामुळे मलकापूर निवडणुकीत कोणाचा विजय होणार, यावरच कराड दक्षिणचा आमदार कोण होणार हे ठरणार आहे.