रस्त्यावरील चिखलातून चालताना पाय घसरला अन् जागीच मृत्यू झाला, नालासोपाऱ्यातील धक्कादायक प्रकार
Nalasopara News Today: चालताना पाय घसरल्यामुळं एका तरुणावर मृत्यू ओढावला आहे. उघड्या विजेच्या मिटर बॉक्सला चिटकून तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा अस्वस्थ करणारा व्हिडिओ समोर आला आहे.
प्रथमेश तावडे, झी मीडिया
वसईः वसई- विरार परिसरात गेल्या आठवड्यात पावसाने (Monsoon) जोर धरला होता. मुसळधार पावसामुळं अनेक सखल भागात पाणी साचले होते. तर, अनेक ठिकाणी झाडेही उन्मळून पडली होती. पावसाळ्यात सर्वात मोठा धोका असतो तो म्हणजे तुटलेल्या तारांचा आणि विजेच्या खांबाचा. नालासोपाऱ्यात (Nalasopara) विजेचा झटका लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चालताना पाय घसरुन पडल्यामुळं या व्यक्तीवर मृत्यू ओढावला आहे. आशिषकुमार शर्मा असं या व्यक्तीचे नाव आहे.
घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर या परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तर, आशिषकुमारच्या मृत्यूला महावितरणचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्येही कैद झाला आहे. आशिषकुमार चिखल साचलेल्या रस्त्यावरुन चालत जात होता. त्याचवेळी चालत असताना त्या रस्त्यावर पसरलेल्या चिखलावरुन पाय घसरला. पाय घसरल्याने त्यांचा तोल गेला व बाजूलाच उघड्या असलेल्या मीटर बॉक्सवर जाऊन तो पडला.
महावितरणवर केला आरोप
इलेक्ट्रिक बॉक्स उघडा असल्याने आशिषकुमारचा पाय त्या बॉक्समध्ये पडल्याने तो विद्युत प्रवाहात सापडला व विजेच्या झटक्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तर महावितरणाच्या हलगर्जी कारभारामुळं हा मृत्यू झालाचा आरोप करण्यात येत आहे.
पुण्यातही विजेचा शॉक लागून मृत्यू
पुण्यातही प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळं एका तरुणाला प्राण गमवावा लागला आहे. लोखंडी कंपाऊंडला एका तरुणाचा हात लागल्याने शॉक बसून त्याचा जागेवर मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली होती. अजयकुमार शर्मा असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या पश्चात्त दोन मुले आणि पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे.
विजेचा झटका लागण्याचा धोका ही काळजी घ्या
पावसाळ्यात विजेचा शॉक लागण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी सुरक्षिततेची काळजी आपणच घ्यायची गरज आहे. घरातील भिंती आणि छतातून पाणी गळत तर नाहीये ना? याची वेळीच खात्री करुन घ्या. जर छत गळत असेल तर भिंतींना वॉटरप्रुफ कोटिंगने भरुन घ्या. भिंतीतून पाणी झिरपत असेल तर ते विजेच्या तारांपर्यंत पोहोचण्याची भिती असते त्यामुळं घरात करंट पसरू शकतो. रस्त्यावरुन चालताना जर तुम्हाला एखादी तार तुटलेली दिसली तर त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ महावितरणच्या कार्यालयात फोन करुन कर्मचाऱ्यांची याबाबत माहिती द्या. अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्यामुळं मोठी दुर्घटना घडू शकते.