सागर आव्हाड, झी मीडिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे: महाराष्ट्रात मान्सून (Maharashtra Monsoon) सक्रीय झाला असून शनिवारपासून मुंबई, पुण्यात मुसळधार पावसाला (Mumbai, Pune Rain) सुरुवात झाली आहे. पहिल्यात पावसात नागरिकांचा गोंधळ उडाला आहे. तर प्रशासनाने केलेल्या कामाची पोलखोल केली आहे. मुंबईत पावसामुळं दोन जणांचा जीव गेला आहे. कर पुण्यातही प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळं एका तरुणाला प्राण गमवावा लागल्याची घटना उघडकीस आली आहे. (Pune Rain News)


पुण्यात घडली मोठी दुर्घटना


पुण्यात पावसाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र पावसाच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. लोखंडी कंपाऊंडला एका तरुणाचा हात लागल्याने शॉक बसून त्याचा जागेवर मृत्यू झाला आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली असून शनिवार असल्याने शाळा बंद होती अन्यथा पुण्यात मोठी दुर्घटना घडली असती. त्यामुळे महावितरणच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 


घरातून कामासाठी निघाला


अजयकुमार शर्मा असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या पश्चात्त दोन मुले आणि पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कोंढवा परिसरात अजयकुमार हा कामानिमित्त तिथून जात होता. त्याला अचानकपणे त्या तारांचा धक्का लागला. त्याला इतक्या जोरात शॉक बसला की यात त्याचा जागीच  मृत्यू झाला आहे. मात्र, याबाबत महावितरण विभाग कुठलीही जबाबदारी घेण्यास तयार नसून पोलिस देखील तक्रार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे माझ्या भावाला न्याय द्यावा, अशी मागणी अजयकुमार शर्मा यांच्या भावाने केली आहे.


पुण्यात मुसळधार पावसाची शक्यता


मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. मुंबई पुण्यात पावसाने शनिवारपासून जोर पकडला आहे. येत्या 4-5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुण्यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे शहर आणि आसपासच्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता, वेधशाळेने व्यक्त केली आहे. 


IMD पुणे येथील हवामान विभागाच्या अंदाजानुसार जोरदार ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यासाठी यलो अलर्टचा इशाराही जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत लगतच्या घाट भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण घाटमाथा  परिसरात आणि या प्रदेशांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची अपेक्षा आहे.