शेणातून उभा केला मोठा व्यवसाय, आता ऑर्डर्स थांबत नाहीयेत...
सोलापुरातील जय संतोषी माँ गोशाळेला जर्मनी आणि मलेशिआतून तब्बल एक लाख गोवऱ्यांची ऑर्डर मिळालीये.
सोलापूर - तुम्हाला एखादी गोष्ट विकता येत असले तर तुम्हाला पैसे कमावण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. ही बातमी वाचून कदाचित तुम्हीही स्वतःचा व्यवसाय करायलाच हवा असा विचार कराल. ज्या गोष्टींना आपण फेकून देतो, ज्या गोष्टी आपल्याला टाकाऊ वाटतात त्यांनाही विकून पैसे कमावले जाऊ शकतात. बातमी आहे सोलापुरातून
सोलापुरातील जय संतोषी माँ गोशाळेला जर्मनी आणि मलेशिआतून तब्बल एक लाख गोवऱ्यांची ऑर्डर मिळालीये. ही ऑर्डर जवळपास पूर्ण होत देखील आली आहे. सध्या या गोशाळेच्या माध्यमातून मलेशिआला गोवऱ्या निर्यात करण्याच जोरदार काम सुरू आहे.
शिवपुरीच्या अध्यात्मिक अग्निहोत्र केंद्रांकडून जगभरात अग्निहोत्र परंपरा चालवली जाते. भारतासह जगभरातल्या विविध देशांमध्ये शिवपुरीच्या या केंद्रकडून अग्निहोत्र परंपरा चालवली जातेय. याच अग्निहोत्रासाठी गाईच्या शेणाच्या गोवऱ्यांची आवशकता असते. जगभरात चालणाऱ्या या परंपरेसाठी सोलपुरातून गोवऱ्या निर्यात होणार आहे.
जय संतोषी माँ गोशाळा ही मागच्या अनेक वर्षांपासून गोवऱ्या निर्मितीचं काम करतेय. या गोशाळेत गोवऱ्या निर्मिती करत असताना त्यांच्या विशेष पॅकिंगकडे लक्ष दिले जाते. एक्स्पोर्ट होणाऱ्या गोवऱ्या विशिष्ट पद्धतीने पॅक केल्या जातात. गोवऱ्या तयार केल्यानंतर या गोवऱ्या पूर्णपणे वाळवल्या जातात. त्यामध्ये थोडीही ओल ठेवली जात नाही. त्यामुळे या गोवऱ्या वर्षभरातसुद्धा खराब होत नाहीत.
गोवऱ्या वाळल्यानंतर त्याचे पॅकिंग दहा दहाच्या संख्येत करण्यात येते. त्यानंतर पॉलिथिन पॅकींग करून ते कार्टन बॉक्स पॅक करण्यात येतात. कंटेनर शिपिंगने ह्या गोवऱ्या जर्मनी व मलेशियात पाठवल्या जातात. स्थानिक बाजारात गोवऱ्या चाळीस रुपयाला २५ नग याप्रमाणे विक्री केल्या जातात. तर विदेशात दहा रुपयाला एक याप्रमाणे त्याची किंमत मिळते. या शिवाय ही गोशाळा गोफीनाईल, गोमुत्र अर्क, जीवामृत, दंत मंजन, पेन किलर बाम यासारखी अनेक उत्पादने तयार करते, मात्र गोवऱ्यांच्या निर्मिती व निर्यातीमुळे ही गोशाळा सध्या सोलापुरात चर्चेत आहे.
Web title - man from solapur created business from cow dung worth million rupees