अहमदनगर : गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने देशातच काय तर संपूर्ण जगात, हाहाकार माजवला होता. ज्यामुळे अनेकांनी त्यांचे प्राण गमावले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे कोणी आपला भाऊ गमावला, तर कोणी आपला मुलगा, कोणी आपली मुलगी गमावली तर कोणी आपली आई. अनेक लोकं यामुळे अनाथ देखील झाले आहेत. अशा लोकांना मदत देण्यासाठी सरकार पुढे आलं आहे. सरकार अनाथ आणि विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी मदत करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परंतु  गमावलेला आधार आणि व्यक्तीची कमी पैशांमुळे भरून काढणं शक्य नाही. त्यामुळे आयुष्य जगण्यासाठी जे महत्वाचं असतं ते म्हणजे जोडीदाराची साथ आणि आईवडिलांची सावली.


यासगळ्यात एका तरुणाने पुढे येऊन एक वेगळाच आदर्श जगासमोर ठेवला आहे. या तरुणाने एका विधवा महिलेशी लग्न केलं आहे, एवढेच नाही तर तिच्या 9 महिन्याच्या बाळाला देखील त्याने स्वीकारले आहे. ज्यामुळे या तरुणाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ज्यामुळे काही स्वयंसेवी संस्था देखील या जोडप्याला मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहे.



अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील देवळाला गावातील हा तरुण आहे. या तरुणाचे नाव किशोर राजेंद्र ढुस आहे. याच भागातील एका महिलेच्या नवऱ्याचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. परंतु तिच्या पदरात 9 महिन्यांचे बाळ असल्याने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.


त्यामुळे किशोर याने संबंधित महिलेशी लग्न करून तिच्या बाळाचाही स्वीकार करण्याची तयारी दर्शवली. ज्यानंतर दोन्हीकडील कुटूंबियांनी या लग्नाला संमती दर्शवली. ज्यानंतर या दोघांनीही लग्न केलं. गावातील पुढारी मंडळींनी या लग्नाकरिता पुढाकार घेतला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे यांनी या दाम्पत्याचा सत्कार केला आहे. त्यांना कपडे आणि वस्तू भेट देण्यात आले आहेत.


विशेष म्हणजे राहुरी फॅक्टरी येथील अर्बन निधी संस्थेतर्फे बाळाच्या नावावर 11 हजार रुपयांची मुदत ठेव ठेवण्यात आली आहे. यावेळी याची पावती देखील या दाम्पत्यांना देण्यात आली आहे.