वर्धा: गर्लफ्रेण्डच्या साखरपुड्यानंतर नवऱ्याच्या घरासमोर प्रियकराने लावला खराखुरा बॉम्ब
Man Plant Bomb In Front Of Home: सकाळी या घरात राहणाऱ्या एका मुलीला घराच्या प्रवेशद्वाराजवळ बॉम्बसदृश्य गोष्टी एका पिशवीत दिसून आल्या. या पिशवीच्या वर एक आणि आतमध्ये एक अशा दोन चिठ्ठ्या होत्या. पिशवीमध्ये टायमरसदृश्य गोष्ट आणि बॅटरीही होती.
Man Plant Bomb In Front Of Home: प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हणतात. याचाच प्रत्यय वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये आला. येथील विठ्ठल वॉर्डमध्ये एका घरासमोर बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. येथील एका घराच्या प्रवेशद्वाराला बॉम्बसदृश्य वस्तू अढकवल्याने पहाटेपासून परिसरामध्ये दहशत होती. संबंधित वस्तूला असलेल्या वायर्स कापून पोलिसांनी ती निकामी केली आणि मोठी दुर्घटना टळली. मात्र त्यानंतर झालेला खुलासा हा अधिक धक्कादायक होता. ही वस्तू प्रवेशद्वाराला या घरात राहणाऱ्या तरुणीच्या प्रियकराने लावली होती. या बॉम्बसदृश्य गोष्टीमागे प्रेमप्रकरणातून नैराश्य आलेला तरुण होता.
नक्की घडलं काय?
आर्वीतील 57 वर्षीय वंदना ज्ञानेश्वर कारमोरे यांच्या घराबाहेरील गेटवर बॉम्बसदृश्य वस्तूची पिशवी अडकवण्यात आला होता. वंदना यांची नात अनुप चोपकरला ही पिशवी पहिल्यांदा दिसून आली. याची माहिती तिने वंदना यांना दिली. सदर पिशवीमध्ये टायमर आणि बॅटरी अशा गोष्टी होत्या. या पिशवीवर आतमध्ये एक आणि बाहेर एक चिठ्ठी ठेवण्यात आलेली. 'हात लावू नका अन्यथा मोठा स्फोट होईल,' असं बाहेरील चिठ्ठीत लिहिलेलं होतं. पिशवीतील टायमर सदृश्य गोष्टीवर 7.29 असा टाइम दिसत होता. याच टायमरच्या बाजूला बॅटरीही होती. सदर गोष्ट पाहून घर मालकीण घाबरली आणि तीने पोलिसांना याबद्दल कळवलं.
प्रेमप्रकरणाशी संबंध
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या पिशवतील वस्तूची तपासणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या रसायनांचे मिश्रण त्याचप्रमाणे माचिसमध्ये वापरतात तो गुल लावलेला कापडही होता. वंदना आणि ज्ञानेश्वर यांच्या मुलाचा नुकताच साखरपुडा पार पडला. तो अमरावतीमधील नवोदय विद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. या साखरपुड्याशी सर घटनेचा संबंध असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ज्या मुलीशी कारमोरे यांच्या मुलाचा साखरपुडा झाला तिच्या प्रियकरानेच ही बॉम्बसदृश्य वस्तू घरासमोर लावल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या प्रेयसीसाठी या तरुणाने तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरापुढे ही बॉम्बसदृश्य गोष्ट लावल्याचा संक्षय पोलिसांना आहे.
पोलिसांना शोधायची आहेत या प्रश्नांची उत्तरं
सध्या तरी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशात पाटणकर यांनी ज्या मुलीशी कारमोरेंच्या मुलाचा साखरपुडा झाला आहे तिच्याशी संपर्क साधला आहे. या मुलीबरोबरच तिच्या घरच्या मंडळींचीही चौकशी केली जाणार आहे. सदर वस्तू या मुलीच्या कथित प्रियकराने कधी, कुठे, कशी बनवली. त्याला यासंदर्भातील काही प्रशिक्षण आहे का? या वस्तूचा खरंच स्फोट होण्याची क्षमता होती का यासारख्या प्रश्नांची उत्तर या तरुणाकडून मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असेल.