निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : मनमाडला झालेल्या पाणी चोरीचा नागरिकांनी चांगलाच धसका घेतला आहे. अक्षरशः घरासमोर साठवून ठेवलेल्या पाणीच्या टाकीला कुलूप लावून, सीसीटीव्हीच्या निगराणीखाली पाणी सुरक्षित ठेवण्याची केविलवाणी वेळ मनमाडकर नागरिकांवर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनमाड शहराची पाणीटंचाई सर्वश्रुत आहे. पालिकेकडून आजही महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा करून ठेवतात. उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी टंचाईत आणखीनच भर पडली आहे. पाच दिवसांपूर्वी मनमाडच्या श्रावस्ती नगर भागात घराच्या छतावर साठवून ठेवलेले पाणी गेल्याची घटना समोर आली. अज्ञात चोरट्याविरोधात पाणीचोरीचा राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला. पाणीचोरीच्या घटनेचा पाणीटंचाईत होरपळणाऱ्या नागरिकांनी धसका घेतला असून नागरिकांनी घरासमोर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीला कुलूप लावून आपले पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी  धडपड चालविली आहे. ज्यांच्याकडे सीसीटीव्ही आहेत त्यांनी सिसीटीव्हीच्या कॅमेऱ्याची नजर पाण्याच्या टाकीच्या दिशेने करून ठेवली आहे .


एकंदरीत पाणीचोरीच्या घटनेमुळे मनमाड शहराचा पाणीप्रश्न पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला असून, सव्वालाख लोकवस्तीच्या शहराला गेल्या ४ दशाकपासून तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतामुळे मनमाडचा पाणीप्रश्न गंभीर होत चालला आहे. आता तर पाणी चोरीचे प्रकार होऊ लागले आहे. पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांना पाण्याच्या टाकीला कुलूप लावण्याची वेळ आली आहे.