निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड : उपवर मुलांना गाठून त्यांच्याशी लग्नाचे (Marriage) नाटक करून फसवणूक करणाऱ्या महिलेला पोलिसांनाी (Manmad Police) थेट लग्नमंडतापत बेड्या ठोकल्या आहेत. दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असताना थेट लग्न मंडपातून पोलिसांनी वरात काढल्याचा प्रकार मालेगावच्या दसाने गावात समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान लग्नासाठी पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मयुरी चव्हाण असे या फसवणूक करणाऱ्या महिलेचे नाव असून आहे. आरोपी महिलेने 3 महिन्यापूर्वीच मालेगावच्या दाभाडीतील तरुणाशी विवाह केला होता. त्यानंतर लग्नाच्या पाचव्याच दिवशी आरोपी महिला मुलाच्या कुटुंबियांना सव्वातीन लाख रुपयांचा गंडा घालून फरार झाली होती. फसवणूक झालेलं कुटुंब मयुरीचा बराच वेळ शोध घेत होते. मात्र ती सापडत नव्हती. शेवटी आरोपी मयुरी दुसरं लग्न करणार असल्याची माहिती मिळताच पीडित कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी मयुरीला थेट लग्नमंडपातूनच अटक केली आहे.


दाभाडीतील तरुणीला फसवल्यानंतर मयुरी दसाणे येथील तरुणाला गाठून दुसऱ्या लग्नाच्या तयारीत होती. ठरल्याप्रमाणे लग्न समारंभ देखील पार पडणार होता. मात्र लग्नाला उपस्थितीत वऱ्हाडी मंडळींना वधू पाहून धक्काच बसला. दाभाडीतील तरुणासोबत या मुलीने लग्न केल्याचे वऱ्हाडींच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ हा सगळा प्रकार फसवणूक झालेल्या दाभाडीच्या तरुणाला सांगितला. पीडित तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठून आपली आपबीती पोलिसांना सांगितली.


पोलिसांनी हा प्रकार ऐकताच त्यांनाही धक्का बसला. हा सगळा फसवणूकीचा प्रकार असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी थेट लग्न मंडपातून दुसऱ्या लग्नाच्या तयारीत असलेल्या मयुरीला अटक केली. तिच्यासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान राज्यातही लग्नाळू मुले शोधून त्यांच्याकडून पैसे घेऊन लग्न जमवून देणारी टोळी सक्रिय असून नाशिक, कोपरगावच्या महिलेसह काही जण यात सहभागी असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.पोलीस या ठकबाजांचा शोध घेत आहे.


"या संदर्भात सोमवारी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये एका महिलेला अटक करण्यात आली आहे. आरोपी महिलेने लग्न झालेलं असताना पैशांसाठी दुसऱ्यांसोबत लग्न केले. त्यांची एक टोळी होती. या टोळीमध्ये दोन महिला देखील आहेत. या महिलेची सुद्धा दोन नावे आहेत. मालेगावमध्ये अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे जर कोणाची फसवणूक झाली असेल तर त्याने पुढे येऊन माहिती द्यावी," अशी माहिती पोलीस निरीक्षक रवी मगर यांनी दिली.