मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे आक्रमक, 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणास्त्र
Maratha Reservation : विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असतानाच मनोज जरांगे यांनी मोठी घोषणा केलीय. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत.
नितेश महाजन, झी मीडिया जालना : मराठा आरक्षणासाठी जरांगे येत्या 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणला (Hunger Strike) बसणार आहेत. 16 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजता म्हणजेच मराठा मुक्ती संग्राम दिनापासून मराठ्यांना ओबीसीतून (OBC Quota) स्वतंत्र आरक्षण मिळावं यासाठी जरांगे अंतरवाली सराटीत उपोषण करणार आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी जरांगेंनी आतापर्यंत पाच वेळेस उपोषण केलंय. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे ( Manoj Jarange) यांनी 29 सप्टेंबरपासून उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्यांनी 17 सप्टेंबरपासूनच उपोषण करणार असल्याचं जाहीर केलंय. जरांगे यांच्या उपोषणामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा वेगळे वळण घेण्याची शक्यता आहे
मराठा आरक्षणासाठी जरांगेंची यापूर्वीची उपोषणं
जरांगेंनी 29 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 मराठा आरक्षणासाठी पहिल्यांदा उपोषण केलं.
दुसरं उपोषण 25 ऑक्टोबर 2023 ते 2 नोव्हेंबर2023 दरम्यान केलं
तिसरं उपोषण 20 ते 27 जानेवारी 2023 असं 8 दिवसांचं उपोषण केलं
चौथे उपोषण 8 जून ते 13 जून असे 6 दिवस जरांगेंनी उपोषण केलं.
जरागेंनी पाचवं उपोषण 20 ते 24 जुलै 2024 असं पाच दिवस उपोषण केलं
मनोज जरांगे यांच्या यापूर्वीच्या उपोषणामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती. तसंच उपोषणाचे पडसाद राज्यभरात पसरले होते. लोकसभा निवडणुकीतही जरांगे फॅक्टरचा महायुतीला मोठा फटका बसला होता. त्यातच आता विधानसभेसाठी मनोज जरांगे यांनी राज्यभरात 288 उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा केलीय. सध्या मनोज जरांगे हे घोंगडी सभा घेऊन वातावरण तापवत आहेत. त्यातच आता मनोज जरांगेंनी उपोषण करणार असल्याचं जाहीर केल्यानं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापणार आहे.
महायुतीच्या मंत्र्यांचं स्पष्टीकरण
दरम्यान, देवेंद्र फडणवीस सत्तेतील मंत्र्यांना कामे करून देत नाहीत या मनोज जरांगे यांच्या आरोपावर मंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांना बाहेरून माहिती अपुरी मिळते. मराठा आरक्षण संदर्भात तुमची कुठलीही शंका असेल तर तुम्ही आधी मला विचारा किंवा मला सांगा मी शंकांचे निरसन करेल. याविषयी अधून मधून माझं त्यांच्यासोबत आरक्षणाविषयी बोलणं चालू आहे. मराठा आरक्षणाविषयी अजूनही काही शंका असतील त्यांनी मला सांगावं मी त्यांच्या शंकांचे निरसन करेन अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे