Manoj Jarange on Chhagan Bujbal: छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत का? असा प्रश्न मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विचारला आहे. सरकार भुजबळांना गप्प का बसवत नाही? अशी विचारणाही त्यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या मुलाखतीत केली आहे. तसंच यावेळी त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल असा जाहीर इशाराही दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जातीयवाद संपवायचा असेल तर सरकारने आता स्पष्ट बोलण्याची गरज आहे. अन्यथा छगन भुजबळ राज्यातील जातीयवाद बंद होऊ देणार नाहीत. छगन भुजबळांचं ऐकून मराठे आणि ओबीसी यांनी वाद घालत कायदा-सुव्यवस्था बिघडवू नका असं आवाहनही त्यांनी केलं. गावागावात तेढ निर्माण करण्याचं काम फक्त छगन भुजबळांनी केलं आहे. आम्ही जिथे सभा घेतो तिथे सभा घ्यायची गरज काय? भुजबळांनी जातीयवाद पसरवण्याचं काम केलं असून ते त्यांनाच बंद करावं लागणार असं मनोज जरांगे म्हणाले आहेत. 


"भुजबळ माझे शत्रू नाहीत, पण त्यांचे विचार मराठा विरोधी आणि द्वेषाने भरलेला आहे. आमच्यासमोर सभा घ्याचच्या आणि हात पाय तोडायची भाषा करायची. आंतरवालीच्या आंदोलनाची परवानगी भुजबळांच्या माध्यमातूनच नाकारली, भुजबळांना सरकार गप्प बसवत नाही तोवर ते गप्प बसणार नाहीत. भुजबळांना जातीय दंगली घडवून आणायच्या आहेत," असा गंभीर आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. 


पुढे ते म्हणाले की, "आपण जेव्हा एखाद्या पक्षाच्या मोठ्या पदावर काम करतो, एखाद्या मोठ्या नेत्याचा वारसा चालवतो तेव्हा भावनेच्या, जातीय द्वेषाच्या आहारी न जाता जनतेची भावना समजून घ्यावी लागते. जातीय तेढ निर्माण झाल्यास हे का झालं हे समजून घेणं त्यांचीही जबाबदारी आहे. आम्ही कोणाला पाडा असं सांगत कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. याआधी तुम्ही पडला आहात आणि आता पडल्यावर वाईट वाटत आहे. कोणी पाडलं हे माहिती असतानाही मराठ्यांनी द्वेष दिला जात आहे". 


"जर आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर पुन्हा एकदा मराठा आपली ताकद दाखवेल. 288 जागांवर पाडायचे की निवडून आणायचे यावर बैठकीत निर्णय घेणार. एकदा ठरल्यावर त्याच मतावर आम्ही ठाम राहणार. मोजक्यांसाठी समाजाचं वाटोळं करु शकत नाही. माझ्या समाजाची प्रतिष्ठा, वजन तसंच राहिलं पाहिजे," असं मनोज जरांगे यांनी सांगितलं. 


दौऱ्यावरुन ओबीसी नेते आक्रमक झाल्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "लोकशाही असून, कायद्याने अधिकार दिला असताना दौऱ्याला विरोध कऱण्याचं कारण काय आहे. हिंगोलतून आमच्या रॅलीला सुरुवात होत आहे". ओबीसी नेते समजून घेण्यास तयार नाहीत. पण राजकीय स्वार्थासाठी विरोध कऱण्याची सवय लागली आहे. भाकरी तोडण्याचा काहीच संबंध नाही असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.