Maratha Protest: मराठा आऱक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी सध्या उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा समाजाला रास्ता रोको करण्याचं आवाहन केलं आहे. 24 फेब्रुवारीला राज्यभरात रास्ता रोको करा असं ते अंतरवाली सराटी येथे संबोधित करताना म्हणाले आहेत. सकाळी 10.30 वाजता आंदोलन सुरु करण्यास त्यांनी सांगितलं आहे. मराठा आरक्षणाचा विषय संपल्यानंतर धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आवाज उठवणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"राज्यातील प्रत्येक गावात रास्ता रोको करा. सकाळी 10.30 वाजता आंदोलन सुरु करा. पोलिसांनी परवानगी दिली नाही दिली तरी आंदोलन करा. पण यावेळी जाळपोळ करू नका.  शहरातील नागरिकांनी शहरात आणि गावातील लोकांनी सकाळी 10.30 ते 1 आणि ज्यांना जमलं नाही त्यांनी संध्याकाळी 4 ते 7 पर्यत आंदोलन करा. रोज आंदोलन करा. पण  कुणाचीही गाडी फोडू नका. जाळू नका, पण पुढे जाऊ देऊ नका. आंदोलनाचा त्रास विद्यार्थ्यांना होऊ देऊ नका," असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.


"पोलिसांनी आंदोलनादरम्यान ताब्यात घेतलं तर अख्ख्या गावाने पोलीस ठाण्यात जाऊन बसू. आमदार, खासदार, मंत्री यांनी आता आमच्या  दारासमोर यायचं नाही. दारासमोरची जागा आमची आहे. यांच्या दारातदेखील कुणी जायचं नाही. दारात यायचं नाही याचा अर्थ त्याने ठरवायचा आहे. निवडणुका मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ नये. आम्हाला आदर्श आचारसंहितेचा सन्मान राखता यायला पाहिजे," असंही त्यांनी सांगितलं 


पुढे ते म्हणाले की, "निवडणुकीसाठी ज्या गाड्या येतील त्या पेटवू नका, फोडू नका. त्या गाड्या गोठयात नेऊन लावा आणि निवडणूक झाली की देऊन टाका. मराठा आरक्षण विषय संपवू द्या. नंतर धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आवाज उठवणार. 24ते 29 तारखेदरम्यान सगेसोयरे कायदा केला नाही तर वयोवृद्धांनी माझ्यासोबत आमरण उपोषण करावे. त्यांना टॉयलेटला सुद्धा सरकारने न्यावे. उपोषणादरम्यान कुणी मेल तर शिंदे-फडणवीस यांची जबाबदारी असेल. वयोवृद्ध जर इथे उपोषणात येऊन बसले तर सरकारचा सर्वात मोठा अवमान असेल".


"आम्हाला नको असलेलं आऱक्षण सरकार देत आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली तरच आम्ही माघार घेऊ. दोन दिवसांत अंमलबजावणी करा. मराठा आणि कुणबी सरसकट करायला काय अडचण आहे? कुणबी प्रमाणपत्र ने घेणाऱ्यांना पश्चाताप होईल. 5-6 जण वगळता सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे. आता आपले कुणबी असल्याचे पुरावे सापडले आहेत. त्यामुळे कुणबी मराठे एकच आहेत. ज्यांना कुणबी नको ते आपल्यावर रुसले आहेत त्यामुळे ज्यांना मराठा म्हणून आरक्षण मिळालंय त्यांनी ते घ्यावं," असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.