`किती वेड्यात काढणार? फडणवीसांना सांगतोय की मराठा समाजाला...`; सभेआधीच जरांगे कडाडले
Manoj Jarange Patil Beed Sabha: बीडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या `इशारा सभे`आधी मनोज-जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेतून इशारा दिला आहे.
Manoj Jarange Patil Beed Sabha: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यामधील शिंदे सरकारला दिलेला मुदत उद्या म्हणजेच 24 डिसेंबर रोजी संपत आहे. याच पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये मनोज जरांगे-पाटील जाहीर सभा घेणार आहे. मराठा समाजाने या सभेला 'इशारा सभा' असं नाव दिलं असून या सभेमध्ये सहभागी होण्यापूर्वी मनोज जरांगे-पाटलांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट उल्लेख करत इशारा दिला आहे.
किती वेड्यात काढणार?
बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना, "तुम्ही किती वेड्यात काढणार या समाजाला? हा लहान समाज नाही. तुम्हाला वाटतं तो एक आहे. त्याचं ऐकल्यावर फायदा होईल. पण मग मराठे बाजूला गेले तर? कोणाचा फायदा होणार?" असा सवाल सरकारला विचारला आहे. तसेच पुढे बोलताना, "प्रत्येक राज्यातील मोठ्या जाती त्यांनी टार्गेट गेल्या आहेत. बरेचेसे दावे केलेत यांनी," असं जरांगे-पाटील म्हणाले. 'यांनी म्हणजे कोणी?' असा प्रश्न विचारला असता जरांगे-पाटलांनी, 'ते सगळं सभेत सांगतो,' असं उत्तर दिलं.
थेड फडणवीस यांचा उल्लेख
जरांगे-पाटील यांनी या पत्रकार परिषदेमध्ये थेट फडणवीस यांचा उल्लेख केला. बीडमधील कार्यकर्त्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीशींबद्दल विचारण्यात आलं असता जरांगे पाटलांनी फडणवीस यांना इशारा दिला. "मी गृहमंत्री फडणवीस यांना पुन्हा एकदा सांगतो की मराठा समाजाला टाळू नका. त्याचं ऐकून तुम्ही मराठा समाजावर अन्याय करु नका. तुम्ही नोटीस दिल्याने काय अडचण झालीय तुम्हाला सांगतो. लोक तुम्हाला नाही सांगत, आम्हाला सांगतात. मी अध्यात नाही मध्यात नाही मला नोटीस कशी काय आली. मला आता नोटीस आली ना. आता ट्रॅक्टर जप्त होणार ना मग चला मी पण येतो आंदोलनाला असं त्यांचं म्हणणं आहे. काय होतंय हे तुम्हाला कळतंय का? तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या. तोडगा काढायची भूमिका घ्या," अशी विनंती जरांगे-पाटील यांनी फडणवीस यांना केली.
मराठ्यांकडेच त्यांच्यासाठी औषध आणि उपचार
पुढे बोलताना जरांगे-पाटील यांनी फडणवीस यांना, "याआधी तुम्ही एक डाव टाकला होता. तुम्ही किंवा तुमच्या सरकारनं म्हणा. त्यात काय झालं तुम्हाला माहितीये. पु्न्हा असा डाव टाकायचा प्रयत्न करु नका भयानक परिस्थिती होईल," असा इशारा दिला. एका पत्रकाराने, इशारा सभा नाव ठेवलं आहे असं म्हणत प्रश्न विचारला. त्यावर जरांगे-पाटील यांनी, "समाज काहीही नावं ठेऊ शकतो. विनंती सभा केल्या त्याने काय फरक पडला. इशाऱ्याने तरी त्यांना काय फरक पडणार? त्यांना आता मराठ्यांनीच फरक पडणार आहे. मराठ्यांकडेच त्यांच्यासाठी औषध आणि उपचार दोन्ही आहेत," अशी प्रतिक्रिया नोंदवली. "चर्चेनं काम होणार नाही आता कृतीचा विचार करावा लागेल. तर जमेल. चर्चेला काय हरकत आहे. ते गप्पा हाणतात आम्हीही गप्पा हाणतो. पण त्यातून पुढील काही होत नाही," असं जरांगे-पाटील म्हणाले.