मुंबई : पावसाची वाट पाहणाऱ्य़ांसाठी एक बॅडन्यूज आहे. मान्सून (Monsoon 2022)  गोव्याच्या सीमेवर रेंगाळल्यामुळे त्याचं राज्यातलं आगमन आणखी लांबणीवर पडलं आहे. केरळमध्ये वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनच्या वाटचालीला वातावरणातील बदलांमुळे काहीसा ब्रेक लागला आहे. त्यामुळे आता येत्या 4-5 दिवसांत राज्यात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Monsoon 2022 Delayed in Maharashtra)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 किंवा 12 जूनला मान्सूनचं तळकोकणातून राज्यात आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या नागरिकांना आता आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.


उन्हाच्या झळांपासून लवकरच दिलासा मिळेल अशी आस लावून बसलेल्या नागरिकांची निराशा झाली आहे. उन्ह सावलीचा खेळ सुरु असला तरी ढग दाटून येणार कधी असा प्रश्न शेतकऱ्यांना ही पडला आहे. पेरणीला घाई न करण्याची सूचना कृषीमंत्र्यांनी दिली आहे.


दुसरीकडे रत्नागिरीच्या लांजा तालुक्याला वळवाच्या पावसानं चांगलंच झोडपलं. संध्याकाळी अचानक भरून आलं आणि वादळी वा-यासह मुसळधार पाऊस झाला. यामुळे हवामान खात्यानं दिलेला अंदाज खरा ठरलाय. अचानक पाऊस आल्यामुळे नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली असली तरी त्यामुळे तापलेल्या वातावरणात गारवाही मिळालाय.