लातूर : मान्सूनने काल मराठवाड्यात एन्ट्री केल्यानंतर मध्यरात्री उशिरा ते पहाटेच्या सुमारास हा मान्सून लातूर जिल्ह्यातही दाखल झाला आहे. लातूर शहरात भल्या पहाटे मान्सूनच्या सरी कोसळल्या. मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या या सरी असल्या तरी शेतकरी आणि नागरिकांसाठी या सरी दिलासा देणाऱ्या होत्या. लातूर शहर आणि परिसरासह जिल्ह्यातील अनेक भागात हा मॉन्सून बरसलाय. त्यामुळे शेतकऱ्यासहित सर्वच जण सुखावले आहेत. मान्सून दाखल होण्यास २४ जुन उजडल्यामुळे सर्वच जण हैराण होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मृग नक्षत्र निघाल्यानंतर काही ठिकाणी मॉन्सूनपूर्व सरीही बरसल्या होत्या. त्यामुळे ऊन,गरमी आणि उकाड्यापासून काही अंशी नागरिकांना दिलासा मिळाला होता. जिल्ह्यात गेल्यावर्षी जून अखेर पर्यंत पावसाची २५० मिमी इतकी नोंद झाली होती. मात्र यावर्षी पावसाची १००मिमी इतकी ही नोंद झालेली नाही. एकूणच लातूर जिल्ह्यात बरसलेल्या या पावसाने येत्या काळातही चांगलाच जोर धरावा जेणेकरून रखडलेल्या पेरण्या आणि तीव्र पाणी टंचाईपासून लातूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळू शकेल. त्यामुळे बरसत असलेला हा पाऊस येत्या काळात चांगल्या पद्धतीने बरसावा अशी अपेक्षा सर्वच जण व्यक्त करीत आहेत.



अकोल्यातही मुसळधार


आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अकोला शहरासह जिल्ह्यात सर्वदूर दमदार पाऊस झालाय. जिल्ह्यातील बार्शिटाकळी, बाळापूर, मूर्तिजापूर , अकोट, तेल्हारा आणि पातूर या तालुक्यांमध्ये या पावसाने जोरदार बॅटींग केली आहे. सध्या जिल्ह्यात सर्वदूर पावसाची रिपरिप सुरूच आहे. अनेक दिवसांपासून पावसात खंड पडला होता त्यामुळे शेतातील पीक धोक्यात आली होती आणि शेतकरी सुद्धा चिंतेत होते. मात्र आजचा हा पाऊस शेती आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे. अकोला जिल्ह्य़ात उशिरा पडलेल्या पावसामुळे चिंतेचे मोठे वातावरण होते. मात्र या पावसानंतर पेरणीला सुरुवात होणार असल्याची चिन्हं दिसत आहेय..