...तर अजित पवारांना रुग्णालयात दाखल करणार; 101 ताप, प्लेटलेट्सचा उल्लेख करत डॉक्टरांची माहिती
Ajit Pawar Health Update: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांच्या प्रकृतीसंदर्भात सविस्तर माहिती दिली.
Ajit Pawar Health Update: राज्यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन तापलेलं असतानाच दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आजारी असल्याने या राजकीय घडामोडींदरम्यान प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. अजित पवार यांच्या तब्बेतीसंदर्भातील माहिती डॉक्टर संजय काकोटे यांनी दिली आहे. अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. अजित पवारांना 101 इतका ताप आहे. त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. त्यांना सलाईन लावण्यात आली आहे. त्यांच्यावर सध्या घरीच उपचार सुरु आहेत, असं डॉ. काकोटे यांनी अजित पवारांच्या 'देवगिरी' या निवासस्थानाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
4-5 दिवसांपासून डेंग्यूची लागण
अजित पवार यांच्या शरीरातील पांढऱ्या पेशीदेखील कमी झाल्या आहेत. उद्या (1 नोव्हेंबर रोजी) अजित पवारांच्या प्लेटलेट्ससंदर्भातील महत्त्वाची चाचणी केली जाणार असल्याचं माहिती डॉ. काकोटे यांनी मंगळवारी सायंकाळी बोलताना दिली. आज होणाऱ्या चाचणीनंतरच अजित पवार यांना रुग्णालयामध्ये दाखल करायचं की नाही हे ठरवलं जाईल अशी माहिती डॉ. काकोटे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. "अजित पवार यांना मागील 5 दिवसांपासून डेंग्यूची लागण झाली आहे. अजितदादांना मागील 4-5 दिवसांपासून डेंग्यूची लागण झाली आहे. एनएस1 टायटन स्ट्राँगलीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. आता सुद्धा त्यांना 101 इतका ताप आहे," असं डॉ. काकोटे यांनी सायंकाळी पत्रकारांना सांगितलं.
नक्की वाचा >> 'एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय'; जरांगेंचा फडणवीसांना टोला! म्हणाले, 'बांगड्या भरल्यागत चाळे...'
प्लेटलेट्स कमी झाल्या
"अजित पवार यांच्या प्लेटलेट्स कमी होत चालल्या आहेत. आधी त्या 1 लाख 60 हजार होत्या. आता 88 हजारांवर आल्या आहेत. त्यांच्या शरीरामधील पांढऱ्या पेशीदेखील कमी झाल्या आहे. आम्ही उद्या (1 नोव्हेंबर रोजी) प्लेटलेट्स तपासणार आहोत. त्यात काही विशेष सापडलं तर आम्ही त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेऊ. सध्या तरी त्यांच्यावर घरीच उपचार सुरु आहेत. सलाईन लावण्यात आली असून औषधंही सुरु आहेत. त्यांना प्रचंड थकवा जाणवत आहे. त्यांना विश्रांतीची खूप गरज आहे," असं डॉ. काकोटे यांनी स्पष्ट केलं.
नक्की वाचा >> संतापलेल्या जरांगेंचा थेट मोदी-शाहांना इशारा; फडणवीसांवर निशाणा साधत म्हणाले, 'असं वागल्यावर...'
जरांगेच्या मुलीने केलेली टीका
रविवारीच प्रसारमाध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटलांची मुलगी पल्लवी हिने अजित पवारांच्या आजारपणाबद्दल भाष्य केलं होतं. "माझं कुटुंब माझ्यासमोर आणू नये असं आमच्या वडिलांनी सांगितलं आहे. आता याला सरकारच जबाबदार आहे. इतर जे कोणी उपोषण करत आहेत त्यांनी किमान पाणी तरी घेतलं पाहिजे. वडिलांची अवस्था पाहून आईची परिस्थिती वाईट झाली आहे. अजित पवार अंतरवलीत येणार होते. पण त्यांना आता डेंग्यू झाला आहे, बाकीच्या कार्यक्रमांना ते जातात पण मराठा आरक्षणासाठी म्हटले की लगेच आजारी पडतात," असं म्हणत पल्लवीने टीका केली होती.