Maratha Aarakshan Manoj Jarange Patil Warns PM Modi Amit Shah: मराठा आरक्षणासाठी राज्यात सुरु असलेल्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण मिळालं आहे. बीड, धाराशीवसारख्या जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जालन्यामधील इंटरनेट सेवा बंद केल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेतला. याचसंदर्भात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणावर बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी गृहमंत्री फडणवीस हे केवळ मराठ्यांवर गुन्हे दाखल करण्याची भाषा करतात असं म्हणत आक्षेप नोंदवला आहे. तसेच फडणवीस असेच वागत राहिले समाजाचा रोष ओढावून घेतल्यानंतर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान कसे काय बनवतील? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन आला आहे. राज्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी शाह यांनी फडणवीसांना फोन केल्याचा संदर्भ देत जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला बसलेल्या मनोज जरांगे-पाटील यांना पत्रकाराने प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना जरांगे पाटलांनी, "लय बेकार आहे म्हणा. त्यांनी सांगितलं नाही. माझा नंबर घ्या म्हणा. मी त्यांना सांगतो खरं काय आहे. ते कधीच सांगणार नाहीत," असं म्हटलं.
नक्की वाचा >> ...तर अजित पवारांना रुग्णालयात दाखल करणार; 101 ताप, प्लेटलेट्सचा उल्लेख करत डॉक्टरांची माहिती
पुढे बोलताना जरांगे पाटील यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. "त्या माणसावर आम्हाला परत माया येत होती. कालपासून आमची भावना चांगली झाली होती. पण 307 कलम... अरे तुला दुसरं काही येतं का नाही. केसेसशिवाय दुसरं काही बोलतच नाही. दुसरं काहीच येत नाही का? मार्ग काढू बाबांनो, आपण बसू हे असं नाही बोलता येत? राज्य चालवायला निघाले, स्वप्न बघत होते. मोदीसाहेब डबल पंतप्रधान झाले पाहिजेत. असं वागल्यावर ते कसे होतील? काहीही गप्पा हाणतो उगाच. म्हणजे काय बोलावं एवढ्या मोठ्या नेत्यानं. केसेसशिवाय बोलतच नाही. आमच्या मराठ्याच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढ्या केसेस टाक काय करायचं ते कर जा," असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला.
नक्की वाचा >> 'एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय'; जरांगेंचा फडणवीसांना टोला! म्हणाले, 'बांगड्या भरल्यागत चाळे...'
"तुमच्यासारख्या माणसाला म्हणतोय आम्ही या, बसा. चर्चा करा. तुमच्या बाजूने वळला ना मराठा. मग काड्या करायची काही गरज आहे का? 307 करु... मग लटकव आमच्या लोकांना. तुला काय त्यात मजा लागते का? तुला टकवायचं ठरवलं मराठ्यांनी तर मग काय करशील. काय बोलावं काय नाही. अमित शाहसाहेब दुसरं सगळ्यांना सोडून त्यालाच फोन करतात. त्यांच्याकडे काय आहे? त्यांनी सर्व इचको करुन ठेवलाय. तुमचाही इचको होईल. मग तुम्हाला घरी जावं लागेल," अशा शब्दांमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी केंद्रातील वरिष्ठ भाजपा नेत्यांना मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इशारा दिला.