Maratha Aarakshan Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीचा प्रश्न पुन्हा एकदा महाराष्ट्रात तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सरकारला मराठा आरक्षणासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या काही दिवसांपासून पुन्हा उपोषणाला बसले आहेत. मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंबड तालुक्यामधील अंतरवाली सराटी गावामध्ये अन्न-पाणी त्याग करुन पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा आज सहावा दिवस सुरु आहे. रविवारी रात्री जरांगेची प्रकृती खालावली आहे. जरांगे-पाटील यांनी डॉक्टरांकडून तपासणी करुन घेण्यासाठी आणि उपचार घेण्यासाठी नकार दिला आहे. यासंदर्भात जरांगे-पाटील यांच्या कुटुंबियांनाही त्यांच्या प्रकृतीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. असं असतानाच आता जरांगे-पाटलांच्या कुटुंबियांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.


प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना अजित पवारांवर टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनोज जरांगे-पाटील यांच्या कुटुंबियांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आपल्या वडिलांनी सुरु केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे-पाटील यांच्या मुलीने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. "माझं कुटुंब माझ्यासमोर आणू नये असं आमच्या वडिलांनी सांगितलं आहे. आता याला सरकारच जबाबदार आहे. इतर जे कोणी उपोषण करत आहेत त्यांनी किमान पाणी तरी घेतलं पाहिजे. वडिलांची अवस्था पाहून आईची परिस्थिती वाईट झाली आहे. अजित पवार अंतरवलीत येणार होते. पण त्यांना आता डेंग्यू झाला आहे, बाकीच्या कार्यक्रमांना ते जातात पण मराठा आरक्षणासाठी म्हटले की लगेच आजारी पडतात," असं म्हणत  मनोज जरांगे-पाटील यांच्या कन्येनं अजित पवारांवर निशाणा साधला आहे.


नक्की वाचा >> 'फडणवीस, जरांगेंना दिल्लीत नेऊन मोदींसमोर बसवा'; 'ब्राह्मणांना का बदनाम करता?' ठाकरे गटाचा सवाल


बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या


दुसरीकडे मनोज जरांगे-पाटील यांची प्रकृती रविवारी खालावली. त्यानंतर त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. "मला बोलता येते तोपर्यंत तुम्ही चर्चेला या. आरक्षण द्यायचे की नाही ते सांगा," असं आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेरासमोर चर्चा करता येणार नाही असं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांमध्ये मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी मराठा आंदोलनकर्ते उपोषणाला बसले आहेत. दुसरीकडे राज्यामधील सरकारमध्ये मंत्री असलेल्या काही नेत्यांनी लवकरच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघेल असं म्हटलं आहे. मनोज जरांगे-पाटील आणि सरकारमध्ये मागील महिन्यामध्ये झालेल्या चर्चेनंतरही आरक्षण न देण्यात आल्याने आश्वासनाला 40 दिवस उलटून गेल्यानंतर जरांगे-पाटील पुन्हा उपोषणाला बसले.