`फडणवीस, जरांगेंना दिल्लीत नेऊन मोदींसमोर बसवा`; `ब्राह्मणांना का बदनाम करता?` ठाकरे गटाचा सवाल
Maratha Aarakshan Thackeray Group Slams Fadnavis Modi Government: सध्या महाराष्ट्रात ढोंगबाजी, द्वेष व सुडाचे राजकारण सुरू आहे व त्याची सुरुवात महाराष्ट्रात फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून झाली, असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे.
Maratha Aarakshan Thackeray Group Slams Fadnavis Modi Government: महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठीच्या मागणीचं आंदोलन तापलेलं असतानाच ठाकरे गटाने थेट सत्ताधारी शिंदे सरकारबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वी केलेल्या महाराष्ट्र दौऱ्याचा संदर्भही ठाकरे गटाने दिला असून त्यावरुनही सत्ताधारी मराठा आरक्षणाबद्दल गंभीर नाहीत असं म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना न विचारता मराठा समाजावर पोलिसांनी लाठीचार्ज केला का? आपण ब्राह्मण असल्याचा न्यूनगंड अचानक फडणवीस यांना का वाटू लागला? शिंदेंचं मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी तडजोड करण्याची भाषणा फडणवीसांना जमते मग मराठा समाजाच्या मागण्यांवर का जमत नाही असे अनेक प्रश्न ठाकरे गटाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विचारले आहेत.
राजकारण पोरकटपणाचे
"महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन तीव्र होत असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी समाज माध्यमांवर ‘मी पुन्हा येईन’चा व्हिडीओ टाकून खळबळ उडवली. उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे- पाटील यांच्या आंदोलनावरून लक्ष उडविण्याचा हा डाव असावा. फडणवीस आता सारवासारवी करतात की, ‘‘पुन्हा येईनचा व्हिडीओ टाकून मी परत कशाला येऊ?’’ फडणवीस यांचे विधान हास्यास्पद व राजकारण पोरकटपणाचे आहे. त्यांच्या मनातली उबळ वारंवार वर येत आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
फडणवीस शिंदे यांना टिकवणारा तोडगा देतात पण...
"राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न भडकला आहे व सरकार सैरभैर झाले आहे. आता गावागावांत साखळी उपोषणे सुरू झाली आहेत व राजकीय नेत्यांना गावबंदी करून रोष प्रकट केला जात आहे. राज्याच्या अनेक मंत्र्यांच्या कार्यक्रमांत गोंधळ घातला जात आहे. मंत्र्यांना कॉलर पकडून जाब विचारला जात आहे. आतापर्यंत 4 जणांनी आत्महत्या केल्या, पण सरकारला मराठा आरक्षणप्रश्नी तोडगा सापडत नाही. फडणवीस यांच्याकडे तोडगा व सेटलमेंटचे दुकान आहे. एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवले तर लगेच त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांचे मुख्यमंत्रीपद वाचवू, असा तोडगा त्यांनी दिला. फडणवीसांचे डोके नाना फडणवीसांचे असेल असे वाटले होते, पण ते पुण्याच्या तत्कालीन कारस्थानी कोतवालाचे दिसते. शिंदे यांना विधान परिषदेवर आणून मुख्यमंत्रीपदी टिकवले जाईल, पण अपात्र ठरणाऱ्या इतर मंत्री व आमदारांना कसे टिकवणार? फडणवीस शिंदे यांना टिकवणारा तोडगा देत आहेत, पण मराठा आंदोलनकर्त्यांचा जीव वाचविणारा तोडगा देत नाहीत," अशा शब्दांमध्ये ठाकरे गटाने फडणवीस यांना लक्ष्य केलं आहे. "राज्यातील बेकायदेशीर मिंधे सरकार टिकवणे ही त्यांची (फडणवीस यांची) प्राथमिकता आहे. मराठ्यांची गरीब पोरे उपोषणानं मेली तरी चालतील, असाच एकंदरीत कावा दिसतोय," अशी 'शंका'ही ठाकरे गटाने व्यक्त केली आहे.
ब्राह्मण असल्याचा फडणवीस यांना अचानक न्यूनगंड का वाटावा?
"पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात-शिर्डीत येऊन गेले. ते शरद पवारांवर बोलले, पण मनोज जरांगे-पाटलांच्या उपोषणावर आणि आंदोलनावर बोलले नाहीत. गावागावांत उपोषणकर्त्यांचे जीव जात असताना पंतप्रधान महाराष्ट्रात येऊन राजकीय चिखलफेक करतात, भाजपचा प्रचार करतात. हे अफझलखानी धोरण आहे. यावर फडणवीस यांच्यावर टीका केली की ते सांगतात, ‘‘मी ब्राह्मण असल्यामुळे टार्गेट केले जाते.’’ स्वतः ब्राह्मण असल्याचा असा अचानक न्यूनगंड त्यांना का वाटावा? पेशव्यांच्या राघो भरारीबद्दल समस्त मराठ्यांना अभिमान आहे. चापेकर बंधू, टिळक, वीर सावरकर, क्रांतिवीर फडके यांच्या शौर्याच्या आड ब्राह्मणत्व आले नाही. न्यायप्रिय रामशास्त्री हे महाराष्ट्राचे आदर्श आहेत. नितीन गडकरी यांच्याविषयी कोणी चुकीची भाषा वापरत नाही. मुख्य म्हणजे फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यावर पहिली दोनेक वर्षे महाराष्ट्राने त्यांना डोक्यावरच घेतले होते. फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून ते मुख्यमंत्री नकोत, असा पवित्रा महाराष्ट्रातील बहुजन समाजाने कधीच घेतला नाही व फडणवीस यांच्या विरोधात कोणी आंदोलन केले नाही. मोदींच्या मनात आले म्हणून फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. यापेक्षा तेव्हा त्यांची कर्तबगारी नव्हती," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
महाराष्ट्रात ढोंगबाजी, द्वेष व सुडाचे राजकारण
"फडणवीस यांनी त्यांच्या पोटातले कारस्थानी दात बाहेर काढायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रात त्यांच्याविषयी रोष निर्माण होऊ लागला. फडणवीस यांनी स्वतःच आपले नेतृत्व आणि प्रतिमा नष्ट केली आहे. महाराष्ट्राने अंतुले यांच्या रूपाने मुसलमान, सुशीलकुमार शिंदे यांच्या रूपाने कर्तबगार दलित मुख्यमंत्री स्वीकारला व मनोहर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री ब्राह्मण होते. महाराष्ट्राला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचे धाडस प्रथम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. महाराष्ट्र कर्तबगारी व शौर्याला मानतो. ढोंग व कारस्थानाचा तिरस्कार करतो. सध्या महाराष्ट्रात ढोंगबाजी, द्वेष व सुडाचे राजकारण सुरू आहे व त्याची सुरुवात महाराष्ट्रात फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यापासून झाली," अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करताना पोलीस गृहमंत्र्यांना विचारत नाहीत?
"मोदी-शहांची पावले ही सुडाच्या राजकारणाची पावले आहेत. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे असे विषारी वातावरण कधीच नव्हते. जालन्यात मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला, हवेत गोळ्या चालविल्या व त्यातून आजचे वातावरण महाराष्ट्रात निर्माण झाले, पण गृहमंत्री फडणवीस म्हणतात, मराठा आंदोलकांवर लाठीमार केला हे मला माहीत नाही. गृहमंत्र्यांना विचारून कोणी लाठीमार करतो काय? असा प्रश्न ते विचारतात. राजकीय विरोधकांच्या बाबतीत कोणत्या भूमिका घ्यायच्या, कोणाला अडकवायचे, कोणत्या भ्रष्टाचाऱ्यांना क्लीन चिट द्यायची, कोणाचे गुन्हे मागे घ्यायचे, कोणाच्या मागे चौकश्यांचा ससेमिरा लावायचा, हे सर्व गृहमंत्र्यांना विचारून करणारे पोलीस इतक्या मोठ्या मराठा आंदोलकांवर लाठ्या चालवताना गृहमंत्र्यांना विचारीत नाहीत, हे फडणवीसांचे म्हणणे खरे मानले तर महाराष्ट्रातील सकल मराठा आंदोलकांना ते काडीचीही किंमत देत नाहीत हाच त्यांच्या बोलण्याचा अर्थ होतो," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
जरांगेंना मोदींच्या समोर बसवावे आणि...
"सरकार मराठा आंदोलन व आरक्षणाच्या प्रश्नावर गंभीर नाही. सरकारला हे आंदोलन चिघळवून भडका उडालेला हवा आहे. सरकारला भीमा-कोरेगावप्रमाणे पेटवापेटवी व्हावी असे वाटते आहे. फडणवीस-मोदी-शहा हे अपात्रतेनंतरही शिंदे यांना ‘टिकविण्याचा’ तोडगा शोधून बसले, पण मराठ्यांच्या आरक्षणावर त्यांना तोडगा काढता येत नाही. फडणवीस यांनी मनोज जरांगे-पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांना विमानात बसवून दिल्लीस न्यावे व मोदींच्या समोर बसवावे. मोदी हे विश्वगुरू आहेत. जागतिक प्रश्नांवर ते तोडगे काढतात. त्यामुळे संसदेचे विशेष सत्र बोलावून मराठा आरक्षणावर तोडगा काढणे त्यांना कठीण नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
ब्राह्मणांना का बदनाम करता?
"मिंधे-पवार मराठा आहेत. फडणवीस ब्राह्मण आहेत. येथे तुमच्या जाती-पोटजातीचा प्रश्न येतोच कोठे? सत्ता भोगताना, महाराष्ट्र ओरबाडताना ‘जाती’ आठवल्या नाहीत, मग आताच का आठवतात? बेकायदेशीर मुख्यमंत्री शिंदे यांना टिकवण्याचा तोडगा आहे, पण जरांगे-पाटील यांचे प्राण वाचविण्याचा तोडगा नागपूरच्या कोतवालाकडे नाही. उगाच ब्राह्मणांना का बदनाम करता?" असा प्रश्न ठाकरे गटाने फडणवीस यांना विचारला आहे.